काय सर, तुम्ही पण! परीक्षा केंद्रावर जप्त मोबाईल परत देण्यासाठी प्राचार्याने घेतली लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:06 IST2025-03-05T19:04:30+5:302025-03-05T19:06:06+5:30

प्राचार्यास लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले

Principal took bribe from student to return seized mobile phone from exam center | काय सर, तुम्ही पण! परीक्षा केंद्रावर जप्त मोबाईल परत देण्यासाठी प्राचार्याने घेतली लाच

काय सर, तुम्ही पण! परीक्षा केंद्रावर जप्त मोबाईल परत देण्यासाठी प्राचार्याने घेतली लाच

हिंगोली : परीक्षार्थीचा मोबाइल परत करण्यासाठी चार हजारांची लाच घेणाऱ्या स्व. राधाताई मुसळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यासह एका खासगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई हिंगोली शहराजवळील लिंबाळा (मक्ता) भागात ५ मार्च रोजी केली.

हिंगोली तालुक्यातील लिंबाळा (मक्ता) भागात स्व. राधाबाई मुसळे कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात बारावीचे परीक्षा केंद्र असून, २७ फेब्रुवारी रोजी तक्रारदाराचा मुलगा मोबाइल घेऊन परीक्षेला गेला होता. या ठिकाणी पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्याचे मोबाइल जप्त करून प्राचार्य पंजाब गव्हाणे याच्याकडे दिले होते. परीक्षा संपल्यानंतर काही विद्यार्थी मोबाइल परत घेण्याकरिता प्राचार्य गव्हाणे यांच्या कक्षाकडे गेले. परंतु, खासगी इसम गोपाल कोंगे (रा. वायचाळ पिंपरी, ता. सेनगाव) याने प्राचार्य गव्हाणे याच्या सांगण्यावरून पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मोबाइल परत करण्यासाठी विनंती केली असता हजार- पाचशे रूपये कमी द्या, असे गव्हाणे म्हणाला. 

त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी एका विद्यार्थ्याच्या पालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या तक्रारीची पडताळणी करून ५ मार्च रोजी पथकाने सापळा रचला. त्यानुसार स्व. राधाताई मुसळे कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य पंजाब गव्हाणे याने चार हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारत तक्रारदार यांच्या मुलाचा मोबाइल परत केला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गव्हाणे यास रंगेहात पकडले. याप्रकरणी प्राचार्य पंजाब गव्हाणे व खासगी इसम गोपाल कोंगे याच्याविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधीक्षक संजय तुंगार, पोलिस उपअधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनायक जाधव, प्रफुल्ल अंकुशकर, युनूस शेख, विजय शुक्ला, ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलिक, राजाराम फुपाटे, गजानन पवार, तानाजी मुंडे, रवींद्र वरणे, गोविंद शिंदे, योगिता अवचार, शेख अकबर यांच्या पथकाने केली.

प्राचार्यांच्या घरात आढळले १४ ॲन्ड्राॅइड मोबाइल...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्राचार्य पंजाब गव्हाणे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लाच म्हणून स्वीकारलेले चार हजार, त्या व्यतिरिक्त ९ हजार ६९० रुपये, तसेच एक मोबाइल आढळून आला. या शिवाय आरोपीच्या लिंबाळा भागातील घराच्या झडतीत परीक्षार्थींचे विविध कंपन्यांचे तब्बल १४ ॲन्ड्राॅइड मोबाइल आढळून आले.

Web Title: Principal took bribe from student to return seized mobile phone from exam center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.