हट्टा येथे पोलिसांनी अवैध गुटखा पकडला; वाहनासह ५ लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:55 IST2018-09-03T18:53:26+5:302018-09-03T18:55:21+5:30
औंढा तालुक्यातील आसोला पाटीजवळ आज सकाळी ९.३० वाजता एका जीपमधील २८ पोते गुटखा पोलिसांनी जप्त केला.

हट्टा येथे पोलिसांनी अवैध गुटखा पकडला; वाहनासह ५ लाखाचा मुद्देमाल जप्त
हट्टा/जवळा बाजार (हिंगोली ) : औंढा तालुक्यातील आसोला पाटीजवळ आज सकाळी ९.३० वाजता एका जीपमधील २८ पोते गुटखा पोलिसांनी जप्त केला. यावेळी जीप आणि गुटखा असा जवळपास ५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
जवळा बाजार येथून जवळ असलेल्या आसोला पाटीवर जिंतूर येथून जवळा बाजारकडे एका जीपमध्ये ( एम.एच.२६ व्ही.६४४७ ) गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सपोनि गुलाब बाचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जवळा बाजार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, सचिन शिंदे, अरविंद गजभार, विभूते, गणेश लेकुळे यांनी छापा मारून कारवाई केली.
याप्रकरणी मनोज मधूकर गाढवे (जीपचालक, रा. पाचलेगाव ता.जिंतूर) व राजेंद्र दसमले (रा.नूतन वसाहत जि.जालना) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारवाईत २८ पोते गुटखा व जीप असा जवळपास ५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात असून याबाबत अन्न व प्रशासन विभागाकडून गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.