सारंगवाडीच्या डोंगरदरीत आढळले प्रेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:55 IST2018-05-19T00:55:18+5:302018-05-19T00:55:18+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील पारवा येथील व्यक्तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सारंगवाडी शिवारातील डोंगरदऱ्यामध्ये १८ मे रोजी आढळून आला. कपड्यांवरून नातेवाईकांनी प्रेत ओळखले असून घातपाताची शंका व्यक्त होत आहे.

सारंगवाडीच्या डोंगरदरीत आढळले प्रेत
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरडशहापूर/कुरूंदा : औंढा नागनाथ तालुक्यातील पारवा येथील व्यक्तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सारंगवाडी शिवारातील डोंगरदऱ्यामध्ये १८ मे रोजी आढळून आला. कपड्यांवरून नातेवाईकांनी प्रेत ओळखले असून घातपाताची शंका व्यक्त होत आहे.
सारंगवाडी येथील महिला शिवारातील डोंगरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या असता १८ मे रोजी त्यांना कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याची महिती त्यांनी गावातील लोकांना सांगितली. त्यानंतर पोलिसांना कळविल्याने घटनास्थळी कुरूंदा पोलीस ठाण्याचे सपोनि शंकर वाघमोडे, जमादार प्रकाश नेव्हल आदींनी भेट देवून पंचनामा केला. मृतदेहाची पाहणी केली. त्याची ओळख पटेल तेथे असे काही आढळले नाही.
२०-२२ दिवसांपूर्वी मुरलीधर किशनराव कदम (४०, रा.पारवा ता.वसमत) हा व्यक्ती हरवल्याची तक्रार कुरूंदा पोलीस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने हरवलेल्या व्यक्तीच्या मुलाला व नातेवाईकांना माहिती देवून घटनास्थळी बोलावले असता मृत व्यक्तीच्या कपड्यांच्या आधारे हा मृतदेह हरवलेल्या मुरलीधर किशनराव कदम यांचा आहे, असे त्यांनी सांगितले.
शवविच्छेदन झाले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच खरा प्रकार समोर येणार आहे. कुरुंदा पोलीस मात्र खून करून मृतदेह या ठिकाणी आणून फेकला असावा, या दिशेने तपास करीत असून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे.