अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 18:51 IST2019-11-16T18:49:50+5:302019-11-16T18:51:36+5:30
औंढा- वसमत राज्यमार्गावर झाला अपघात

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथून जवळच असलेल्या औंढा- वसमत राज्यमार्गावर अज्ञात वाहनाने एका पादचाऱ्याचा चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. संजय जयवंतराव ढेंबरे असे मृत व्यक्तीचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
शिरडशहापूर येथील संजय जयवंतराव ढेंबरे (४२, रा. शिरडशहापूर) हे रात्री औंढा- वसमत राज्यमार्गावर रस्त्याने पायी जात होते. यावेळी चौकीच्या मारोती मंदिराजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात ढेंबरे गंभीर जखमी झाल्याने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले. दरम्यान, या मार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांना हे निदर्शनास आले, त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. घटनेचा पंचनामा जमादार प्रकाश नेव्हल, पी.डी. म्हात्रे, भिसे, अंबेकर आदींनी केला. वाहनचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. मयतावर शिरडशहापूर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यंसंस्कार करण्यात आले.