चतुर्थीनिमित्त गणपतीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहनाने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 12:39 IST2023-11-01T12:38:03+5:302023-11-01T12:39:57+5:30
बाळापुर- वारंगा रस्त्यावरील दाती फाटा येथे मध्यरात्री अपघात....

चतुर्थीनिमित्त गणपतीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहनाने चिरडले
आखाडा बाळापूर ( हिंगोली): आखाडा बाळापुर ते वारंगा या मार्गावर दाती फाट्यावर मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला.यात सत्य गणपतीला पायी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात चिरडले. यात दोन भविकांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी आहेत.
बाळापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील मरडगा येथील दयानंद निर्मल, गजानन काळे, पांडुरंग काळे, महेश झांबरे, सखाराम शिंदे हे पाच भाविक चतुर्थी निमित्त मंगळवारी रात्री भोकर फाटा येथील सत्य गणपतीच्या दर्शनासाठी पायी निघाले होते. मरडगा येथून रात्री पाचजण आखाडा बाळापूर मार्गे निघाले. रात्री बारा वाजेच्या सुमारास आखाडा बाळापूर ते वारंगा मार्गावर दातीफाटा येथे पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने भाविकांना जोरदार धडक दिली. यात दयानंद निर्मल (35), गजानन काळे (36 दोघेही राहणार मरडगा तालुका हदगाव ) या भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण रस्त्याच्या खाली एका खड्ड्यात फेकले गेले.या भीषण अपघातानंतर घटनास्थळावरून वाहन भरधाव वेगात निघून गेले.
दरम्यान, माहिती मिळताच ठाणेदार सुनील गोपीनवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार प्रभाकर भोंग, मधुकर नांगरे, नागोराव बाबळे यांनी अपघातस्थळी भेट दिली. आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात अपघातग्रस्तांना दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यां तपासून दयानंद निर्मल व गजानन काळे यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना प्रथम उपचार देऊन नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली .याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसून बाळापुरच्या ग्रामीण रुग्णालयात मयतांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.