भाटेगाव शिवारात आढळला नांदेड जिल्ह्यातील व्यापाऱ्याचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 17:35 IST2020-03-14T17:34:40+5:302020-03-14T17:35:31+5:30
व्यापाऱ्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा नातेवाईकांचा आरोप

भाटेगाव शिवारात आढळला नांदेड जिल्ह्यातील व्यापाऱ्याचा मृतदेह
वारंगा फाटा : नांदेड जिल्ह्यातील अधार्पूर येथील एका भंगार विक्रेत्या व्यापाऱ्याचा मृतदेह कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव शिवारात शनिवारी ( दि. १४ ) आढळला.
कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव शिवारात नांदेड जिल्ह्यातील अधार्पूर येथील भंगार विक्रेते व्यापारी शेख रसूल शेख मोहम्मद (४०) यांचा मृतदेह १४ मार्च रोजी एका झाडाखाली आढळून आला आहे. सदरील व्यापारी हा दिनांक १३ मार्च रोजी अधार्पूर येथील आपले भंगारचे दुकान उघडून बाहेर जाऊन येतो असे दुकानावरील कामगारास सांगून गेले होते. परंतु ते घरी परत आले नाही. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली.
सदरील व्यक्तीच्या भावास मयताची दुचाकी क्रमांक एमएच-२६ बीएन-०२९२ ही भाटेगाव शिवारात राष्ट्रीय महामार्गलगत १४ मार्च रोजी दिसून आली. यावेळी शोधाशोध केली असता व्यापारी शेख रसूल शेख मोहम्मद यांचा मृतदेह एका झाडाखाली झुडपांमध्ये दिसून आला. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वारंगाफाटा बीट जमादार शेख बाबर, डोंगरकडा बीट जमादार भगवान वडकीले, गजानन भालेराव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
घटनास्थळी जमलेल्या नातेवाईकांनी शेख रसूल शेख मोहम्मद यांचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचे सांगितले. सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी डोंगरकडा येथे नेण्यात आला आहे. परंतु याठिकाणी वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते, शिवाय शवविच्छेन करणारा प्रशिक्षीत कर्मचारीही हजर नव्हता. त्यामुळे नातेवाईक व पोलिसांना याठिकाणी दोन ते अडीच तास ताटकळत बसावे लागले. याप्रकरणी उशिरापर्यंत घटनेची नोंद बाळापूर ठाण्यात झाली नव्हती.