वसमत तालुक्यात भररस्त्यात मध्यरात्री अघोरी पूजा; नक्षीदार गूढ 'कास्य' तांब्या पाहून ग्रामस्थ हादरले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:51 IST2026-03-30T12:50:18+5:302026-03-30T12:51:05+5:30
कुरुंदा पोलिसांनी जप्त केले पूजेचे साहित्य.

वसमत तालुक्यात भररस्त्यात मध्यरात्री अघोरी पूजा; नक्षीदार गूढ 'कास्य' तांब्या पाहून ग्रामस्थ हादरले!
वसमत (हिंगोली): हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील महमंदपुरवाडी मार्गावर २९ मार्चच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्याच्या अगदी मधोमध पूजेचे साहित्य आणि नक्षीकाम केलेला एक जुना 'कास्य' (काशाचा) धातूचा तांब्या ठेवण्यात आला होता. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कुरुंदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व साहित्य जप्त केले आहे.
सोमवारी (३० मार्च) सकाळी हा प्रकार येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
नक्षीकाम केलेला गूढ तांब्या आणि अघोरी विधी
मिळालेल्या माहितीनुसार, महमंदपुरवाडी गावाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर हा विधी करण्यात आला होता. रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या त्या तांब्याला हळद-कुंकू लावलेले असून त्याच्या झाकणावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम केलेले आहे. भररस्त्यात अशा प्रकारे पूजेचे साहित्य पाहून ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
पोलिसांनी जप्त केले साहित्य; शोध सुरू
कुरुंदा पोलिसांनी तो गूढ तांब्या आणि इतर साहित्य आपल्या ताब्यात घेतले आहे. हा तांब्या नेमका कोठून आला आणि हा प्रकार कोणी केला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. भररस्त्यात असा प्रकार करून समाजात भीती निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी हा तांब्या कशासाठी वापरला गेला असावा, यादृष्टीने तपास सुरू केला असून परिसरातील संशयितांची चौकशी केली जात आहे.
"अंधश्रद्धेला बळी पडू नका"; पोलिसांचे आवाहन
या घटनेनंतर कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. "महमंदपुरवाडी मार्गावर आढळलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाऊ नये. हा खोडसाळपणा करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.