युद्धामुळे 'पिवळे सोने' संकटात; वसमतमधील ३०० टन हळदीची निर्यात थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 16:45 IST2026-03-17T16:43:18+5:302026-03-17T16:45:16+5:30

वसमतच्या हळदीची दुबईवारी थांबली, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

Iran-Israel Conflict Hits Hingoli: Export of 300 Tons of Turmeric From Basmat Halted; Prices Crash | युद्धामुळे 'पिवळे सोने' संकटात; वसमतमधील ३०० टन हळदीची निर्यात थांबली

युद्धामुळे 'पिवळे सोने' संकटात; वसमतमधील ३०० टन हळदीची निर्यात थांबली

- इस्माईल जहागीरदार
वसमत (जि. हिंगोली) :
इराण- इस्रायल, अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम येथील हळद व्यवसायावर झाला असून, दररोज या भागातून दुबईसह आखातातील इतर देशांमध्ये होणारी तब्बल ३०० टन हळदीची निर्यात ठप्प झाली आहे. ही निर्यात ठप्प पडल्याने हळदीच्या भावालाही फटका बसला आहे.

हिंगोली जिल्ह्यात हळदीचे उत्पादन राज्यात सर्वाधिक आहे. वसमतच्या हळदीला देशासह परदेशात मोठी मागणी आहे. मागच्या काही दिवसांपासून इराण - अमेरिका, इस्रायल या देशांत युद्ध सुरू आहे. या युद्धाचा थेट फटका हिंगोलीकरांना सहन करावा लागतोय.

पिवळे सोने म्हणून येथील हळदीची ओळख आहे. मात्र सध्या बाजारपेठेत बंदीचे सावट आहे. वसमत येथील मोंढ्यातून दररोज मोठ्या प्रमाणात हळद दुबईसह इतर आखाती देशांत निर्यात केली जाते. युद्धामुळे ही वाहतूक पूर्णतः कोलमडली आहे. वसमत येथील मोंढ्यातून यापूर्वी दुबईत दररोज १५ ते २० गाड्या (सुमारे ३०० टन) हळद दुबईला जात होती. एका गाडीतून २५ टन हळद निर्यात होते. आता ही निर्यात पूर्णत: बंद झाली आहे. सध्या केवळ बांगलादेशासाठी २ ते ३ गाड्या रवाना होत आहेत. निर्यात ठप्प झाल्याने व्यापारात मोठी घट झाली आहे. युद्धाच्या भीतीमुळे जागतिक बाजारपेठेत मागणी घटल्याने स्थानिक दरावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. हळदीच्या प्रतिक्विंटल दरामध्ये २ हजार ते २ हजार ५०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. सध्या बाजारात हळदीला ११,५०० ते १३,५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. बाजारात हळदीची बोली लावण्यासाठी व्यापारी पुढे येत नाहीत. त्यामुळे आवक असूनही उठाव नाही, अशी सध्याची स्थिती आहे.

वसमतच्या बाजार समितीत नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांसह शेजारील आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातूनही शेतकरी हळद विक्रीसाठी येतात. वर्षभर कष्ट करून पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा असताना, आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

सांगलीऐवजी आता वसमतचे नाव
हळद उत्पादनामध्ये यापूर्वी सांगली जिल्ह्याचे नाव घेतले जात होते. मात्र मागच्या काही वर्षांत जिल्ह्यात हळदीचे उत्पादन वाढले आहे. शिवाय या भागातील हळदीला देश-विदेशातून मागणी आहे. ‘वसमत हळद’ या नावाने येथील हळद देशभरात ओळखली जाते.

तोडगा निघावा 
मागील आठवडाभरापासून निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. मागणी असतानाही हळदीची निर्यात शक्य नाही. यात तोडगा काढणे गरजेचे आहे.
- लक्ष्मीनारायण मुरक्या, व्यापारी

Web Title : युद्ध से 'पीला सोना' संकट में: वसमत से हल्दी का निर्यात रुका, 300 टन फंसा।

Web Summary : ईरान-इजरायल संघर्ष से वसमत का हल्दी निर्यात बाधित, प्रतिदिन 300 टन रुका। कीमतें ₹2,500/क्विंटल तक गिरीं। अंतर्राष्ट्रीय तनाव से स्थानीय बाजारों पर असर, पड़ोसी राज्यों के किसानों को नुकसान।

Web Title : War hits 'yellow gold': Vasmat turmeric exports halted, 300 tons stuck.

Web Summary : Iran-Israel conflict disrupts Vasmat's turmeric exports, halting 300 tons daily. Prices plummet ₹2,500/quintal. Farmers from neighboring states face losses as international tensions impact local markets.