फडणवीसांशिवाय गेल्यास दिल्लीत मुख्यमंत्र्यांचे ऐकणार कोण? जयंत पाटील यांचा सवाल
By विजय पाटील | Updated: September 20, 2022 13:35 IST2022-09-20T13:34:28+5:302022-09-20T13:35:57+5:30
Maharashtra News महाराष्ट्रातल्या चार लाख बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली गेली. आता हे दिल्लीत चालले.

फडणवीसांशिवाय गेल्यास दिल्लीत मुख्यमंत्र्यांचे ऐकणार कोण? जयंत पाटील यांचा सवाल
हिंगोली : वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प आमच्या सरकारने खेचून आणला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा एमओयू काढला. मग अचानक प्रकल्प गुजरातमध्ये गेला कसा? यात आता उशिराने का होईना प्रयत्न होत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत न घेता गेलेल्या मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत ऐकणार कोण? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
हिंगोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी व पक्ष आढावा बैठकीसाठी ते आले होते. यावेळी आ.राजू नवघरे, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले, हा प्रकल्प गेल्याने दीड लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक तर गेलीच शिवाय महाराष्ट्रातल्या चार लाख बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली गेली. आता हे दिल्लीत चालले. मात्र अगरवाल यांच्याशीच चर्चा करून ते महाराष्ट्रातून का जाताहेत? हे विचारले नाही. दिल्लीतही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशिवाय गेलेल्यांचे कोण ऐकणार? जर हा प्रकल्प परत आणला तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, असेही ते म्हणाले.