HSC Exam: सीसीटीव्ही बंद करून शिक्षकानेच पुरविली कॉपी; वसमतमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:43 IST2026-02-17T11:43:33+5:302026-02-17T11:43:57+5:30
सीसीटीव्ही बंद करून ३७ मिनिटं चालला 'कॉपी'चा खेळ! वसमत शहर पोलिसांकडून तपास सुरू

HSC Exam: सीसीटीव्ही बंद करून शिक्षकानेच पुरविली कॉपी; वसमतमधील धक्कादायक प्रकार
- इस्माईल जहागीरदार
वसमत (हिंगोली): बारावीच्या परीक्षेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी शिक्षण विभागाने कडक पावले उचलली असतानाच, वसमत येथील केंब्रिज कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका शिक्षकाने चक्क सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून विद्यार्थ्यांना गाईडमधील उत्तरे सांगितल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अज्ञात शिक्षकाविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
वसमत शहरातील केंब्रिज कॉलेजमध्ये १२ वीच्या परीक्षेसाठी केंद्र आहे. ११ फेब्रुवारी रोजी हिंदी विषयाचा पेपर सुरू असताना, दुपारी १२:३६ ते १:१३ या वेळेत एका शिक्षकाने परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे जाणीवपूर्वक बंद केले. त्यानंतर, नियमांचे उल्लंघन करत विद्यार्थ्यांना गाईडमधील उत्तरे वाचून दाखवली आणि कॉपी करण्यास प्रत्यक्ष मदत केली.या गैरप्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओची दखल घेत शिक्षण विभागाने तातडीने चौकशी सुरू केली.केंद्र संचालक गुलाबराव रामराव नलगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता संबंधित शिक्षकाविरुद्ध अनुचित मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
गटशिक्षणाधिकारी सतीश कास्टे यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल तयार करून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठवला आहे."परीक्षा मंडळाच्या नियमानुसारच परीक्षा घेतल्या जाव्यात, गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही," असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. परीक्षेतील पारदर्शकता धोक्यात आणणाऱ्या या कृत्यामुळे आता त्या संबंधित शिक्षकावर काय कडक कारवाई होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.