हिंगोलीचा 'सर्जा' सांगलीच्या शंकरपटात अव्वल; मालकासाठी कार,चांदीची गदा अन् बाइक जिंकली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:23 IST2025-11-10T17:19:56+5:302025-11-10T17:23:06+5:30
सांगलीतील शंकरपटात हिंगोली जिल्ह्यातील दांडेगावचा सर्जा अव्वल; मालकाला मिळवून दिले फॉर्च्यूनर गाडीचे प्रथम बक्षीस

हिंगोलीचा 'सर्जा' सांगलीच्या शंकरपटात अव्वल; मालकासाठी कार,चांदीची गदा अन् बाइक जिंकली!
- विश्वास साळुंके
वारंगा फाटा ( हिंगोली) : सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शंकरपट स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील दांडेगाव येथील साईनाथ कऱ्हाळे यांच्या ‘सर्जा’ या बैलाने अविश्वसनीय वेग आणि दमदार खेळी करत स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकावले. या उल्लेखनीय विजयामुळे सर्जाने आपल्या मालकाला फॉर्च्यूनर कार, मानाची चांदीची गदा आणि एक दुचाकी अशी भव्य बक्षिसे मिळवून दिली.
या वर्षीची शंकरपट स्पर्धा अत्यंत थरारक वातावरणात पार पडली. देशभरातून नामांकित ५०० पेक्षा अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. सर्जाने आणि संभाजीनगर जिल्ह्यातील गुप करोडी येथील सारंजेराव चव्हाण यांच्या ट्रिपल हिंदकेसरी लखन ह्या जोडीने सुरुवातीपासूनच गती राखत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि अंतिम फेरीत अप्रतिम झेप घेत पहिला क्रमांक मिळवला. विजयानंतरचा बक्षीस वितरण सोहळा आज मंत्रालयात भव्य पद्धतीने पार पडणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साईनाथ कऱ्हाळे यांचा सन्मान होणार आहे अशी माहिती साईनाथ कऱ्हाळे यांनी दिली आहे.
वर्षभराच्या तयारीत शंकरपटात अव्वल
दुर्गम भागातून आलेल्या सर्जाच्या या यशामुळे हिंगोली जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण असून, ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पारंपरिक बैलसंस्कृतीचा जयघोष झाला आहे. सर्जा ने यापूर्वी तीन वेळा विविध ठिकाणी हिंदकेसरी म्हणून मान देखील मिळवला आहे. केवळ एक वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातून साईनाथ कऱ्हाळे यांनी ह्या बैलाला शंकरपटासाठी खरेदी केले आणि त्याचे संगोपन करून जोरदार तयारी करत राज्यभरामध्ये यापूर्वी अनेक बक्षिसे मिळविली आहेत. दांडेगाव सह हिंगोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यामुळे साईनाथ कऱ्हाळे आणि त्यांच्या सर्जाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.