Hingoli: संपूर्ण कर्जमाफीसाठी अनोखे आंदोलन; शेतकरी चढले अपर तहसील कार्यालयावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:00 IST2025-10-30T14:00:02+5:302025-10-30T14:00:27+5:30
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असलेल्या सरकारी धोरणांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.

Hingoli: संपूर्ण कर्जमाफीसाठी अनोखे आंदोलन; शेतकरी चढले अपर तहसील कार्यालयावर
गोरेगाव (जि. हिंगोली) : राज्य शासनाने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, यासह शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी २९ ऑक्टोबर रोजी गोरेगाव येथील अपर तहसील कार्यालयावर चढून आंदोलन केले. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात आंदोलने केली जात आहेत. कर्जमाफी, पीक विमा, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, दुष्काळ अनुदान आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. सध्या नागपूर येथे बच्चू कडू यांचे कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असून, सदर आंदोलनाच्या समर्थनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी २९ ऑक्टोबर रोजी गोरेगाव येथील अपर तहसील कार्यालयावर चढाई केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असलेल्या सरकारी धोरणांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, राहुल कावरखे, प्रवीण मते आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी बीट जमदार राहुल मेयंकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांना कार्यालयाच्या छतावरून खाली उतरविले.