Hingoli: भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू , दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:34 IST2025-10-28T12:33:07+5:302025-10-28T12:34:22+5:30
या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Hingoli: भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू , दोघे गंभीर जखमी
औंढा नागनाथ : तालुक्यातील गोळेगावजवळील कृषी महाविद्यालयाजवळ दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण ठार झाले असून, दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना २७ आक्टोबर सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
शेख उस्मान शेख गफार (रा.वस्सा, ता.जिंतूर) आणि रोहीत परसराम राठोड (रा.सावंगी विमानतळ परिसर, नांदेड) असे अपघातातमृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत. वस्सा येथील शेख उस्मान शेख गफार हे २७ ऑक्टोबर रोजी रात्री दुचाकीने (एमएच२२/बीएफ २४६२) औंढ्याहून जिंतूरकडे जात होते. तर रोहित राठोड हे दुचाकीने (एमएच२६/सीटी ०८७४) जिंतूरहून औंढ्याकडे येत होते. या दोन्ही दुचाकींची गोळेगावजवळील कृषी महाविद्यालयासमोर समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकीवरील चौघे जखमी झाले. या चौघांनाही हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी शेख उस्मान शेख गफार आणि रोहित परसराम राठोड यांना मृत घोषित केले. अरुण दीपक राठोड आणि राज गणेश राठोड (रा. सावंगी, नांदेड) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अघाताचे वृत कळताच औंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी.एस. राहिरे, सहाय्यक उपनिरीक्षक खतीब सय्यामोद्दिन, जमादार राजाराम कदम, सुभाष जैताडे, वसीम पठाण आदींनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.