Hingoli: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे; अधीक्षकानेही दडपली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 19:51 IST2025-10-15T19:48:18+5:302025-10-15T19:51:47+5:30
आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात पॉक्सो आणि ॲट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Hingoli: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे; अधीक्षकानेही दडपली घटना
वारंगा फाटा (जि.हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील एका आश्रम शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील शिक्षकाने येथे निवासी असणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी शिक्षकावर आणि घटना माहीत असूनही माहिती न देणाऱ्या अधीक्षकावर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात पॉक्सो आणि ॲट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
कळमनुरी तालुक्यातील एका आश्रम शाळेत शिकणाऱ्या व निवासी राहणाऱ्या ११ वर्षीय पीडित मुलीने १५ ऑक्टोबर रोजी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता शिक्षक पटवे याने पीडित मुलीला ऑफिसमध्ये एकटीलाच जेवण्यासाठी घेऊन गेला. त्यानंतर तिच्या सोबत अश्लील चाळे केले.पीडित मुलगी घाबरून गेली. त्यानंतर मैत्रिणींसोबत वसतिगृहात जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी अधीक्षक जाधव यांना या घटनेविषयी पीडित मुलीने सांगितले असता त्यांनी या विषयाची माहिती कोणालाही दिली नाही, पीडित मुलीच्या या तक्रारीवरुन शिक्षक पटवे व अधीक्षक जाधव या दोघांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात पोक्सो व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
आरोपी शिक्षक फरार
घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे,फौजदार गणेश गोटके, वारंगा फाट्याचे बीट जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग, शिवाजी पवार, प्रशांत शिंदे,अतुल म्हस्के आदींनी शाळेत भेट देऊन घटनेची माहिती घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी देखील आश्रम शाळेत जाऊन चौकशी केली आहे. अधीक्षक जाधव यास अटक केली असून, पोलिस फरार शिक्षकाचा शोध घेत आहेत. लवकरच त्यासही अटक केली जाईल, असे उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.
पालकांना धक्का बसला
दरम्यान, आश्रम शाळेत मुले व मुली निवासी असतात. त्यासाठी अधीक्षक हे स्वतः हजर असतात; परंतु सदरील शिक्षक या दिवशी शाळेमध्ये कसे काय थांबले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. १६ ऑक्टोबरपासून शाळेला दिवाळीच्या सुट्या लागत असल्याने बहुतांश पालक आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आले असता त्यांना शाळेत हा प्रकार घडल्याचे समजल्यानंतर धक्काच बसला.