Hingoli: भरधाव कारने दुचाकीला उडविले; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:25 IST2025-10-07T16:23:02+5:302025-10-07T16:25:01+5:30
अपघातग्रस्त कारचा चालकही जखमी झाला असून, हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Hingoli: भरधाव कारने दुचाकीला उडविले; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगी जखमी
शिरडशहापूर (जि. हिंगोली) : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार, तर दोन वर्षांची मुलगी जखमी झाली. ही घटना औंढा नागनाथ ते वसमत महामार्गावरील शिरडशहापूरनजीक भवानी टेकडीजवळ ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील शेख एजास शेख रहीम (२६), त्यांची पत्नी नूरजहाँ शेख एजास (२१) आणि दोन वर्षांची मुलगी दुचाकीवरून (एम.एम.२६ झेड २००७) औंढा नागनाथकडून वसमतकडे जात होते, तर भरधाव कार (एम.एच.१२ एनई ३८०३) वसमतहून औंढाकडे येत होती. शिरडशहापूरजवळील भवानी टेकडीनजीक कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात शेख एजास आणि त्यांची पत्नी नूरजहाँ शेख एजास जागीच ठार झाले, तर दुचाकीवरील दोन वर्षांची मुलगी जखमी झाली. वाहने भरधाव वेगात असल्याने, अपघातातून बचावलेली चिमुकली सुमारे १५ फूट लांब फेकली गेली होती, शिवाय दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला नाल्यात गेली. दुचाकीचा तर अक्षरश: चुराडा झाला आहे.
घटनेची माहिती कळताच, औंढा ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणपत राहिरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पती-पत्नीचे मृतदेह औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तर जखमी मुलीवर उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता.
कार चालकही जखमी
अपघातग्रस्त कारचा चालकही जखमी झाला असून, हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कार चालकाचे नाव मात्र समजू शकले नसले तरी हिंगोली तालुक्यातील वरूड काजी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.