Hingoli: चोरटी वाळू वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकावर तस्करांचा हल्ला; तलाठी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:20 IST2025-03-19T13:18:21+5:302025-03-19T13:20:20+5:30
Hingoli News: वसमत तालुक्यात गत अनेक महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक राजरोसपणे सुरु आहे.

Hingoli: चोरटी वाळू वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकावर तस्करांचा हल्ला; तलाठी गंभीर जखमी
Hingoli News: वसमत (हिंगोली): शहरासह तालुक्यात नांदेड जिल्ह्यातील वाळूमाफिये चोरटी वाळू वाहतूक सर्रासपणे करत आहेत. या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एक तलाठी गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर जवळपास चार कर्मचाऱ्यांना भीतीपोटी घटनास्थळावरुन काढता पाय घ्यावा लागला. वाळूमाफीयांची गुंडगिरी वाढल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.
वसमत तालुक्यात गत अनेक महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. या वाळू तस्करीच्या दलालांची संख्या वसमत तालुक्यात झपाट्याने वाढत आहे. १८ मार्च रोजी रात्री १२:३० वाजेदरम्यान मालेगाव मार्गावरील पळसगाव शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या टिप्परला गस्तीवरील महसूल पथकाने रोखले. यावेळी टिप्पर चालकाने निळा मार्गावर टिप्पर पळविले. त्या टिप्परचा पथकाने पाठलाग केला. याचवेळी वाळूमाफियांनी महसूल पथकावर हल्ला करण्यात आला,या हल्ल्यात तलाठी नागनाथ राऊत यांच्या डोक्यावर गंभीर मार लागला. त्यामुळे ते अत्यवस्थ झाले. यावेळी हल्लेखोर आपल्यालाही मारतील या भितीपोटी इतर चार कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करणे सोडले. यानंतर गंभीर जखमी तलाठी राऊत यांना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महसूल पथकावर हल्ला झालेले ठिकाण नांदेड जिल्ह्यात येत असल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले.
चोरटी वाळू विक्री दलाल वाढले
झटपट मालामाल कसे होता येईल हे डोळ्यासमोर ठेऊन काहीजण वाळू तस्करीत गुंतले आहेत. तालुक्यातील चोरटे मार्ग माहित असलेले काहीजण वाळू कशाप्रकारे विक्री करता येईल याच्या वाटा शोधत आहेत. काहीजण नांदेडच्या वाळूमाफियांना हाताशी धरत वाळू तस्करीत उतरले आहेत. ही मंडळी रात्री घातक शस्त्रे घेऊन वावरत असून याचाही प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होतघ आहे.
घटनेचा महसूल कर्मचाऱ्यांनी केला निषेध
मंगळवारी रात्रीच्या सुमारास तलाठ्यावर वाळूमाफीयांनी हल्ला केला. या घटनेचा महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेने निषेध केला आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.