Hingoli: खदानीत पडलेल्या शेळीला वाचविताना अल्पभूधारक शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 19:29 IST2025-08-09T19:29:13+5:302025-08-09T19:29:44+5:30
या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Hingoli: खदानीत पडलेल्या शेळीला वाचविताना अल्पभूधारक शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू
वसमत ( हिंगोली) : तालुक्यातील मुरुंबा शिवारात गायरान जमीनीवर असलेल्या खदानीत पडलेली शेळी काढतांना एका ५० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वसमत तालुक्यातील पळसगाव येथील नागोराव भगाजी पानधोंडे (५०) यांना दिड एकर शेती आहे. या शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे त्यांनी सहा ते सात शेळ्या घेतल्या होत्या. नागोराव हे दररोज शेळ्या चारण्यासाठी जात होते. नेहमीप्रमाणे ८ ऑगस्ट रोजी सकाळी ते मुरूंबा शिवारात गायरान जमीनीवर शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास गायरान जमिनीवर असलेल्या खदाणीच्या पाण्यात एक शेळी पडली.या शेळीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी नागोराव हे खदाणीच्या पाण्यात उतरले.मात्र खदाणीच्या खोल पाण्यात जाताच ते पाण्यात बुडाले. त्यांच्या सोबत एक जण होता त्याने घटलेल्या घटनेची माहिती पळसगाव येथे दिली.
वसमत ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच. घटनास्थळी तहसिलदार शारदा दळवी यांनी भेट देऊन पाहणी केली, यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन बोराटे, साहेबराव चव्हाण, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गोताखोर व पोलिसांनी मयत नागोराव यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ ज्ञानेश्वर पानधोंडे यांनी शुक्रवार रोजी रात्री दिलेल्या खबर वरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पाश्चात्य आई,भाऊ,पत्नी व दोन मुले आहेत.या घटनेने पळसगावावर शोककळा पसरली आहे.