भाचीला छेडल्याने मामा संतापला; समजावूनही न ऐकल्याने युवकाला कायमचे संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 11:46 IST2022-04-19T11:38:18+5:302022-04-19T11:46:22+5:30
तालाब कट्टा भागातील एका मंदिराजवळ युवक एकटा असल्याची संधी साधत मामाने मित्रांना सोबत घेत केला हल्ला

भाचीला छेडल्याने मामा संतापला; समजावूनही न ऐकल्याने युवकाला कायमचे संपवले
हिंगोली: भाचीची छेड काढल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने सपासप वार वरून २३ वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना हिंगोली शहरातील तालाब कट्टा भागात सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने हिंगोली शहर हादरले आहे.
शुभम सखाराम राजे (रा. तालाब कट्टा हिंगोली) असे मयत युवकाचे नाव आहे. शुभम राजे याने भाचीची छेड काढल्याचा बबलू सुभाष धाबे व अन्य दोघांच्या मनात राग होता. सोमवारी रात्री तालाब कट्टा भागातील एका मंदिराजवळ शुभम होता. ही संधी साधून बबलू धाबे व अन्य दोघांनी त्याच्यावर लोखंडी पाईप, गुप्ती व खंजर ने सपासप वार केले. हे वार शुभमच्या गळ्यावर, हातावर झाल्याने रक्तबंबाळ झाल्याने शुभमचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलीस उप निरीक्षक विक्रम विठुबोने, पोलीस हवालदार संजय मार्के आदींच्या पथकांनी घटनास्थळी धाव देऊन तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी पहाटे शोभा सखाराम राजे यांच्या फिर्यादीवरून बबलू धाबे व अन्य दोघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उप निरीक्षक विठुबोने तपास करीत आहेत.