Hingoli: घरकुलाच्या अनुदानासाठी सरपंचाने मागितली लाच; ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:40 IST2025-10-09T13:36:38+5:302025-10-09T13:40:42+5:30
खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारली लाचेची रक्कम

Hingoli: घरकुलाच्या अनुदानासाठी सरपंचाने मागितली लाच; ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले
हिंगोली : लाभार्थीना घरकुल अनुदानाचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या संयुक्त पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी कळमनुरी तालुक्यातील घोडा येथील सरपंचाने पाच हजारांची लाच मागितली. ही लाच खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारताना ८ ऑक्टोबर रोजी कळमनुरी तहसील कार्यालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
कळमनुरी तालुक्यातील घोडा येथील लाभार्थीला मंजूर झालेल्या घरकुल अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला. त्यानंतर अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाभार्थीने सरपंचांना संयुक्त पाहणी अहवालावर स्वाक्षरी मागितली. परंतु, अनुदानाचा हप्ता मिळवून देण्याकरिता सरपंच रावसाहेब नामदेव पाईकराव याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. लाच देणे मान्य नसल्याने लाभार्थीने हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या पडताळणीत सरपंचाने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ‘एसीबी’च्या पथकाने ८ ऑक्टोबर रोजी कळमनुरी तहसील कार्यालयासमोर सापळा रचला. याठिकाणी सरपंच रावसाहेब पाईकराव याने खासगी व्यक्ती सोनबा पंडितराव पतंगे (रा. घोडा, ता. कळमनुरी) याच्यामार्फत पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यावेळी पथकाने रंगेहाथ पकडले.
‘एसीबी’च्या पथकाने सोनबा पतंगे याला ताब्यात घेतले असून, सरपंच रावसाहेब पंतगे मात्र हाती लागलेला नाही. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, युनूस शेख, विजय शुक्ला, भगवान मंडलिक, गजानन पवार, रवींद्र वरणे, पुंडगे, वाघ, जाधव, शेख अकबर यांच्या पथकाने केली.