Hingoli: वाळू माफियांची मुजोरी वाढली; महसूल पथकावर हल्ला करून जप्त टिप्पर पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:21 IST2025-08-01T19:19:47+5:302025-08-01T19:21:47+5:30
या प्रकरणी सहा जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hingoli: वाळू माफियांची मुजोरी वाढली; महसूल पथकावर हल्ला करून जप्त टिप्पर पळवले
सेनगाव (हिंगोली) : तालुक्यातील भानखेडा शिवारात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले होते. तहसीलकडे हे टिप्पर नेत असताना वाळू माफियांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यास मारहाण करून टिप्पर पळविल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी सहा जणांवर शुक्रवारी सकाळी सेनगाव पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व वाहतूक होत आहे. या विरोधात कारवाई करण्यासाठी शुक्रवार रात्री महसूल पथकाने कारवाई करीत अवैध वाळू वाहतूक करणारे चार टिप्पर पकडले. या कारवाई दरम्यान सेनगाव ते येलदरी मार्गावर एका टिप्परमधून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांना मिळाली. त्यावरून घुटुकडे यांनी तीन ग्राम महसूल अधिकारी यांना सोबत घेऊन गुरुवारी मध्यरात्री भानखेडा शिवार गाठले. या ठिकाणी पथकाने भानखेडा शिवाराजवळ वाळू वाहतूक करणारे टिप्पर कडले. त्यानंतर पथकातील ग्राम महसूल अधिकारी अजय चोरमारे यांना टिप्पर मध्ये बसविले टिप्पर पोलीस ठाण्याकडे घेऊन येत असताना उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांचे वाहन पुढे अन टिप्पर मागे धावत होते. यावेळी अचानक एका पांढऱ्या रंगाच्या कार ( एमएच-26बीसी 9566) मधून दोन इसम व काळ्या रंगाच्या जीपमधून ( एच-38-एडी८०५९) नवनाथ राठोड व इतर खाली उतरले. त्यांनी टिप्पर थांवबवून त्यात बसलेले ग्राम महसूल अधिकारी चोरमारे यांना खाली खेचून दगडाने मारहाण केली. या शिवाय अश्लिल शिवीगाळ केली.
दरम्यान, अचानक झालेल्या या प्रकारामुळे महसूलचे पथक प्रतिकार करू शकल नाही. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी चोरमारे यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी शुभम खिल्लारे रा.ब्रहवाडी, नवनाथ राठोड रा.बोडखा व इतर चौघांवर शासकिय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे .या शिवाय या कारवाईत पकडलेल्या इतर तिन टिप्पर विरोधात पोलिस व दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार पवन चाटसे, सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहेत.