४ गुंठ्यात बहरलेली अफूची शेती उद्ध्वस्त; हिंगोली पोलिसांच्या कारवाईने माफियांचे धाबे दणाणले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:53 IST2026-02-17T11:53:06+5:302026-02-17T11:53:57+5:30
वसमत तालुक्यात ४ गुंठ्यांतील अफूची शेती उद्ध्वस्त; ३.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

४ गुंठ्यात बहरलेली अफूची शेती उद्ध्वस्त; हिंगोली पोलिसांच्या कारवाईने माफियांचे धाबे दणाणले
- इस्माईल जहागीरदार.
वसमत: अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी आजवरची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने वसमत तालुक्यातील शिरळी येथे धाड टाकून तब्बल चार गुंठ्यांतील अफूची शेती नष्ट केली आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अफूची लागवड शोधून काढण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, या कारवाईमुळे अमली पदार्थ माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.वसमत तालुक्यातील शिरळी शिवारात १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने छापा टाकून १ क्विंटल ७७ किलो ४५ ग्रॅम वजनाची अफूची झाडे.एकूण ३ लाख ५४ हजार ९०० रुपयांची जप्त केली व प्रताप सुरेश नलगे (वय ४२, रा. शिरळी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात १७ फेब्रुवारी रोजी पहाटे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.तालुक्यात अफुची शेती बहरल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती यावरुन ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली,
"कोणाचीही गय केली जाणार नाही"
या यशस्वी कारवाईनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, "जिल्ह्यात अफू, गांजा किंवा इतर कोणत्याही अमली पदार्थांची लागवड किंवा विक्री करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. अशा अवैध प्रवृत्तींविरुद्ध पोलीस दलाची धडाकेबाज मोहीम यापुढेही सुरूच राहील."
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सपोनि शिवसांब घेवारे, सपोनि कारामुंगे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर गोरे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, किशोर सावंत, संदीप टाक आणि साठे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.