Hingoli: वसमत आगारात बसमध्ये डिझेल भरताना ‘नॉझल’चा स्फोट; महिला कर्मचारी जखमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:46 IST2025-11-13T15:45:00+5:302025-11-13T15:46:29+5:30
जखमी महिला कर्मचाऱ्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Hingoli: वसमत आगारात बसमध्ये डिझेल भरताना ‘नॉझल’चा स्फोट; महिला कर्मचारी जखमी!
वसमत: येथील बस आगारातील डिझेल पंपावर एका एसटी बसमध्ये डिझेल भरत असताना, अचानक नॉझलचा स्फोट झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या स्फोटामुळे महिला कर्मचारी ज्योती काळे या जखमी झाल्या. त्यांना तात्काळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुरुवार, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.२० वाजेच्या सुमारास वसमत बस आगारात ही घटना घडली. श्रीवास्तव नगर, वसमत येथील रहिवासी असलेल्या ज्योती काळे (वय ३७) या डिझेल पंपावर कार्यरत होत्या आणि एका एसटी बसमध्ये डिझेल भरत होत्या.याच दरम्यान, डिझेल पंपाच्या नॉझलमध्ये बिघाड होऊन त्याचा स्फोट झाला. यामुळे डिझेल ज्योती काळे यांच्या अंगावर पडले आणि त्या (भाजल्या) जखमी झाल्या.
दरम्यान, स्फोटानंतर तातडीने तेथे असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी जखमी काळे यांना एका बसमध्ये टाकून उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवले. जखमीवर उपचार सुरू आहे. हा प्रकार पाहण्यासाठी आगारात मोठी गर्दी जमली होती. या घटनेप्रकरणी उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आली नव्हती. या घटनेमुळे बस आगारातील डिझेल पंपाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.