'गाठ माझ्याशी आहे!';निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आमदार नवघरे आक्रमक, रस्त्याचा केला 'पंचनामा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:26 IST2026-03-09T16:25:26+5:302026-03-09T16:26:33+5:30
दीड वर्षातच रस्त्याचे वाजले बारा! आ. राजू नवघरे यांनी उखडून दाखवला महामार्ग; कंत्राटदाराची केली कानउघाडणी

'गाठ माझ्याशी आहे!';निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आमदार नवघरे आक्रमक, रस्त्याचा केला 'पंचनामा'
वसमत (जि. हिंगोली): गेल्या दहा वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेल्या आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या ठरलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून आमदार राजू नवघरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुर्दशा पाहून आमदारांनी स्वतः रस्त्यावर उतरून कामाचा 'पंचनामा' केला. "काम नीट करा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे," असा थेट इशारा त्यांनी यावेळी संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला दिला.
पोट-कंत्राटदारीचा बसला फटका
वसमत शहरातून जाणाऱ्या या महामार्गाचे काम २०१७ मध्ये सुरू झाले होते. मात्र, हे काम पोट-कंत्राटदारीच्या (Sub-contracting) विळख्यात अडकल्याने अद्याप पूर्ण झालेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, वर्षभरापूर्वी झालेल्या रस्त्यावर आताच मोठमोठे खड्डे पडले असून नवनिर्मित दुभाजकही कोसळू लागले आहेत. प्रत्यक्ष पाहणी दरम्यान, आमदारांनी परभणी मार्ग ते मालेगाव मार्ग या पट्ट्यातील उखडलेला रस्ता दाखवत कंत्राटदाराला जाब विचारला.
नागरिकांचा जीव धोक्यात
दादरा पूल परिसरात रस्ता करण्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. "जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामात असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. खोदून ठेवलेले खड्डे तातडीने बुजवावेत, ही शेवटची ताकीद आहे," अशा शब्दांत आ. नवघरे यांनी प्रशासनाला सुनावले. या पाहणीमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाचे वाभाडे निघाले असून आता तरी कामात सुधारणा होणार का? याकडे वसमतकरांचे लक्ष लागले आहे.