जवळा बाजार समितीच्या सभापतींची खुर्ची गेली; १३ विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 14:37 IST2026-03-02T14:36:19+5:302026-03-02T14:37:35+5:30
१३ विरुद्ध शून्य! शिवाजी भालेरावांविरुद्ध अविश्वास ठराव 'असा' झाला मंजूर

जवळा बाजार समितीच्या सभापतींची खुर्ची गेली; १३ विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर
वसमत (जि. हिंगोली): औंढा नागनाथ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची असलेल्या जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. सभापती शिवाजी भालेराव यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव सोमवारी (दि. २ मार्च) १३ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. या दणदणीत निकालामुळे भालेराव यांना सभापती पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात खलबते
या अविश्वास ठरावावर चर्चा आणि मतदानासाठी वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात विशेष बैठक बोलावण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. सभागृहात उपस्थित असलेल्या १५ संचालकांपैकी १३ जणांनी सभापतींच्या विरोधात हात वर करून मतदान केले, तर दोन संचालकांनी या प्रक्रियेत तटस्थ राहणे पसंत केले.
नव्या सभापतीकडे सर्वांचे लक्ष
या निकालाची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अविश्वास ठराव मंजूर झाल्याने जवळा बाजार समितीत आता नव्या सभापतीची निवड कधी होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या सत्तापालटामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.