नियोजनबद्ध खुनाचे गूढ उकलले, पैशाच्या व्यवहारातून बेकरी चालकानेच मजुराला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:26 IST2025-12-06T18:24:18+5:302025-12-06T18:26:19+5:30
हिंगोली जिल्ह्यातील बाळापूरमध्ये थंड डोक्याने नियोजनबद्ध गुन्हा, दोन आरोपींना अटक

नियोजनबद्ध खुनाचे गूढ उकलले, पैशाच्या व्यवहारातून बेकरी चालकानेच मजुराला संपवले
- रमेश कदम
आखाडा बाळापूर (हिंगोली): आखाडा बाळापूर येथे मजुरी करणाऱ्या पंजाबराव राघोजी मोरे (वय ५८) यांच्या नियोजनबद्ध खुनाचे गूढ अखेर पोलिसांनी ५ दिवसांत उकलले आहे. अत्यंत थंड डोक्याने केलेल्या या खुनाचे मूळ कारण आर्थिक देवाण-घेवाण आणि व्याजाचा व्यवहार असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बेकरी चालक आणि त्याच्या एका मजुराला अटक केली असून, या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय घडला?
हनुमान नगर (आखाडा बाळापूर) येथील रहिवासी असलेले पंजाबराव मोरे यांचा मृतदेह दिनांक १ डिसेंबर रोजी कोपरवाडी शिवारात रस्त्याच्या कडेला फेकून दिलेला आढळला होता. उत्तरीय तपासणीमध्ये मोरे यांच्या गळ्याला आवळल्याच्या खुणा आणि इतर बाबींमुळे त्यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले. पंजाबराव मोरे हे मजुरी करत असले तरी त्यांचा व्याजाने पैसे देण्याचा आणि वसुलीचा व्यवहार होता. असाच व्यवहार बाळापूर येथील बेकरी चालक सुदर्शन श्रीहरी फड (वय ३५) याच्यासोबत झाला होता. याच व्यवहारातून फड याने त्याचा बेकरीतील मजूर जियाउल्ला खान खाजा खान (वय ३३) याच्या मदतीने हा नियोजनबद्ध खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले
या खुनाला वाचा फोडण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शिवसांब घेवारे यांच्या विशेष पथकाने कौशल्य पणाला लावले. पथकाने दिवसरात्र परिश्रम घेत शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक विश्लेषण केले आणि गोपनीय माहिती गोळा केली. अखेर ५ डिसेंबरच्या मध्यरात्री पोलिसांनी बेकरी चालक सुदर्शन फड आणि त्याचा साथीदार जियाउल्ला खान या दोघांना अटक केली.
आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी
मयत हा मागासवर्गीय असल्याने आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचे (Atrocity) कलमही लावण्यात आले आहे. यामुळे सदर खुनाच्या गुन्ह्याचा पुढील तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना कळमनुरी न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत, म्हणजेच ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात हत्येचे अनेक पैलू उलगडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.