Hingoli: वाहनाच्या धडकेत जखमी बिबट्याचा जीव वाचवता आला नाही, शेतात आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:56 IST2025-09-10T17:53:17+5:302025-09-10T17:56:50+5:30
वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेला बिबट्या काहीवेळ बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडून होता

Hingoli: वाहनाच्या धडकेत जखमी बिबट्याचा जीव वाचवता आला नाही, शेतात आढळला मृतदेह
- इस्माईल जहागीरदार
वसमत : तालुक्यातील सिंदगी खांडीत मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेदरम्यान एका वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या बिबट्याचा मृतदेह कोठारी शिवारात वनविभागास आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हिंगोली येथे बुधवारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
वसमत तालुक्यातील सिंदगी खांडीत ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आला होता. त्यामुळे शेतशिवारातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली होती. रस्ता ओलांडताना अचानक एका वाहनासमोर बिबट्या आला. वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला होता. प्रत्यक्षदर्शीनुसार बिबट्या काही वेळ बेशुद्ध पडला होता. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, तोपर्यंत बिबट्याने उडी घेत जंगलात धूम ठोकली होती.
जखमी बिबट्याचा वन विभागाचे पथक शोध घेत होते. दरम्यान, काही तासांच्या शोध मोहिमेनंतर मंगळवारी सायंकाळीच जखमी बिबट्याचा मृतदेह कोठारी शिवारात आढळून आला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी हिंगोली येथे नेला. यानंतर १० सप्टेंबर रोजी शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती आहे.