Hingoli: पूर्णा नदीच्या वाळूची तस्करी; माफियांनी पाठलाग करणाऱ्या तलाठ्याला ट्रॅक्टरने उडवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:42 IST2025-11-04T18:41:00+5:302025-11-04T18:42:40+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ मार्गावरील घटना; तलाठी जखमी

Hingoli: पूर्णा नदीच्या वाळूची तस्करी; माफियांनी पाठलाग करणाऱ्या तलाठ्याला ट्रॅक्टरने उडवले
जवळा बाजार (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार ते पुरजळ रस्त्यावर ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग करणाऱ्या आजरसोडा सज्जाचे मलिकार्जुन प्रभाकरराव कापसे यांच्या मोटरसायकलला धक्का लागला. यात तलाठी गंभीर जखमी झाले आहेत.
जवळा बाजार परिसरातील पूर्णा नदी परिसरातून अवैधरीत्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती औंढा नागनाथ तहसील कार्यालयातील पथकास मिळाली असता पथक क्रमांक तीनचे तलाठी दिनकर पौळ, मल्लिकार्जुन कापसे, नितीन अंभोरे, माधव भुसावळे, शीतल चौरे, वर्षा टेंभुर्णे हे जवळा बाजार येथील बाजार समिती परिसरात गस्त घालत होते. यावेळी जवळाबाजारकडून पुरजळकडे एक अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर जात होता. त्यांनी ट्रॅक्टरला हात दाखविण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर थांबविले नाही. त्यामुळे तलाठी मल्लिकार्जुन कापसे यांनी ट्रॅक्टरचा पाठलाग केला. यादरम्यान पुरजळ रस्त्यावर ट्रॅक्टरने तलाठीच्या दुचाकीला धक्का दिला. दुचाकीवरील तलाठी मल्लिकार्जुन कापसे जखमी झाले. जखमी तलाठ्यास जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर ट्रॅक्टर घेऊन चालक फरार झाला; परंतु हिरडगाव परिसरातील एका पांदण रस्त्यात वाळू रिकामी करून निघून गेले असल्याची माहिती जवळाबाजार पोलिसांना मिळताच सहायक पोलिस निरीक्षक कैलास भगत यांच्यासह जमादार इमरान सिद्दिकी, दिलीप नाईक, अंबादास बेले यांच्या पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेतले. याप्रकरणी मंडळ अधिकारी सुजाता नामदेव गायकवाड जवळाबाजार पोलिस चौकीत तक्रार दाखल केली. यावरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.