कर्जमाफीसाठी अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी निघाले मुख्यमंत्र्याच्या भेटीला, कर्जतला अडवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:36 IST2025-02-12T11:33:55+5:302025-02-12T11:36:13+5:30
सरसकट कर्जमाफीसाठी हिंगोलीतील ४० शेतकरी निघाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

कर्जमाफीसाठी अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी निघाले मुख्यमंत्र्याच्या भेटीला, कर्जतला अडवले
- दिलीप कावरखे
गोरेगाव (जि. हिंगोली) : राज्यातील सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी व इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील जवळपास ४० शेतकरी मंगळवारी मुंबईकडे दुपारी चार वाजता रवाना झाले आहेत. परंतु बुधवारी सकाळी या सर्व शेतकऱ्यांना कर्जत (रायगड) पोलिसांनी पुढील आदेशापर्यंत थांबवून घेतले आहे.
११ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता नामदेव पतंगे व इतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. यानंतर दुपारी चार वाजता हे सर्व शेतकरी मुंबईकडे रवाना झाले. परंतु बुधवारी सकाळी या सर्व आंदोलक शेतकऱ्यांना कर्जत (जि. रायगड) येथे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत आपण मुंबईला जाऊ नका, असे पोलिसांनी सांगितले. परंतु जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होत नाही. तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.१२ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी आम्हाला थांबून घेतले असले तरी आम्ही घाबरणार नाहीत. आमचे आंदोलन यापुढेही सुरूच राहील, असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले. गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे, संजय मुळे, गजानन जाधव, प्रवीण मते, दीपक सावके, चंद्रकांत सावके, शांतीराम सावके आदीसह हिंगोली जिल्ह्यातील ४० ते ५० शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.
गोरेगावचे पोलिस मागावर...
हिंगोली पासून मुंबईकडे निघालेले आंदोलक शेतकऱ्यांच्या मागावर गोरेगाव पोलीसही आहेत. जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेवून सरकारकडे जाणे गुन्हा आहे का ? आमच्याकडे कुठले शस्त्र नाही, अंगावर पूर्ण कपडे नाहीत. लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत असताना पोलिसांनी मागावर राहत ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढण्याचे प्रकार नेहमीच होत आहेत.
- नामदेव पतंगे, आंदोलक शेतकरी, गोरेगाव