नेपाळच्या व्यापाऱ्यांचा शेतात येऊन टरबूजांचा सौदा! हिंगोलीच्या युवा शेतकऱ्याचा 'मास्टरस्ट्रोक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 15:52 IST2026-03-09T15:51:56+5:302026-03-09T15:52:51+5:30
७२ दिवसांत ४ लाखांचा नफा; नेपाळचे व्यापारी टरबूजासाठी हिंगोलीत

नेपाळच्या व्यापाऱ्यांचा शेतात येऊन टरबूजांचा सौदा! हिंगोलीच्या युवा शेतकऱ्याचा 'मास्टरस्ट्रोक'
- गंगाधर सितळे
डोंगरकडा (जि. हिंगोली) : कष्ट करण्याची जिद्द आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर शेती हा तोट्याचा नाही तर फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो, हे कळमनुरी तालुक्यातील सुकळी वीर येथील युवा शेतकरी ओंकार सोनाजी मुटकुळे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या ७२ दिवसांच्या कालावधीत त्यांनी टरबूज पिकातून विक्रमी उत्पादन घेत थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत मजल मारली आहे.
पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी ओंकार मुटकुळे यांनी दीड एकर क्षेत्रावर टरबूजाच्या वाणाची लागवड केली. प्रगतशील शेतकरी मारुती खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली टरबूज लागवड केली. त्यासाठी जमिनीची मशागत, दर्जेदार रोपांची निवड आणि संतुलित खत व्यवस्थापन केले. ठिबक सिंचन आणि आधुनिक कीड नियंत्रणामुळे अवघ्या ७२ दिवसांत टरबूजाचा दर्जेदार प्लॉट तयार झाला.
पारंपरिक पिकांना फाटा देत बाह्य बाजारपेठेचा अभ्यास करून घेतलेल्या या निर्णयाचा त्यांना मोठा फायदा झाला. थेट नेपाळ येथील व्यापाऱ्यांनी शेतावरच २९ टन टरबूज प्रतिकिलो २२ रुपये ९० पैशांनी खरेदी केला, तर उर्वरित माल अयोध्या येथील व्यापाऱ्याने उचलला. त्यामुळे मध्यस्थ टाळून शेतकऱ्याला योग्य दर मिळाला.
नेपाळ अन् अयोध्येची बाजारपेठ काबीज
या टरबूजाचा दर्जा इतका उत्कृष्ट होता की, मध्यस्थांची साखळी तोडून थेट नेपाळच्या व्यापाऱ्यांनी शेतावर धाव घेतली. एकूण २९ टन माल २२ रुपये ९० पैसे प्रति किलो या दराने नेपाळला रवाना झाला. उर्वरित मालाची खरेदी अयोध्या येथील व्यापाऱ्यांनी केली.