Hingoli: पांगरा शिंदेत भूकंपाचे सत्र सुरूच! सततच्या हादऱ्यांची सवय, पण ग्रामस्थांत भीती कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:45 IST2025-11-18T11:44:00+5:302025-11-18T11:45:50+5:30
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात गेल्या सात वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि यातील सर्वाधिक हादरे पांगरा शिंदे येथे बसत आहेत.

Hingoli: पांगरा शिंदेत भूकंपाचे सत्र सुरूच! सततच्या हादऱ्यांची सवय, पण ग्रामस्थांत भीती कायम
- इस्माईल जहागीरदार
वसमत ( हिंगोली ) : तालुक्यात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच असून, मंगळवारी (१८ नोव्हेंबर) सकाळी पुन्हा एकदा पांगरा शिंदे परिसरात भूगर्भातून जोरदार आवाज येत जमीन हादरल्याची घटना घडली. गेल्या सात वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने, परिसरातील नागरिकांना हे धक्के आता अंगवळणी पडले आहेत. जमीन हादरली किंवा आवाज आला तरी, 'हे तर सततचेच' म्हणत नागरिक लगेच विसरून दैनंदिन कामात गुंतून जातात.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात गेल्या सात वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि यातील सर्वाधिक हादरे पांगरा शिंदे येथे बसत आहेत. भूगर्भातून आवाज येणे आणि जमीन हादरणे हा प्रकार अनेकदा घडतो.१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ८ वाजून ०६ मिनिटांनी भूगर्भातून आवाज आला आणि जमीन हादरली. हा हादरा जाणवताच काही नागरिक तात्काळ घराबाहेर पडले. मात्र, हा प्रकार वारंवार घडत असल्याने भूकंपाचे धक्के अंगवळणी पडले आहेत. त्यामुळे नागरिक लगेच आपल्या दैनंदिन कामांमध्ये गुंतले. सुदैवाने, या भूकंपाच्या हादर्याने कुठेही नुकसान झाले नाही. तसेच, भूकंपाची अधिकृत नोंद देखील झाली नसल्याचे वृत्त आहे.
सततचे धक्के, मोठी चेतावणी?
सततचे भूकंपाचे धक्के नागरिकांच्या अंगवळणी पडले असले तरी, एक विचार मात्र कायम आहे, हे सततचे हादरे एखाद्या मोठ्या धोक्याची चेतावणी तर देत नाहीत ना? या वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या सत्रामागे भूगर्भात नेमके काय बदल घडत आहेत, याबद्दल परिसरातील नागरिक आणि तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.