हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 07:45 IST2025-12-30T07:45:02+5:302025-12-30T07:45:45+5:30
हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरवून सोडले.

हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे भूकंपाच्या सौम्य धक्क्याने चांगलेच हादरवून सोडले. पहाटे ५ वाजून ५६ मिनिटांनी जिल्ह्याच्या विविध भागांत हे धक्के जाणवले. सुदैवाने या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे प्राथमिक वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार, पहाटे ५:५६ मिनिटांनी जेव्हा बहुतांश नागरिक गाढ झोपेत होते, तेव्हा अचानक जमीन हादरल्याचे जाणवले. औंढा नागनाथ तालुक्यातील दांडेगाव आणि रामेश्वर तांडा परिसरात या धक्क्यांची तीव्रता अधिक जाणवली.
भूकंपाचा प्रभाव केवळ दांडेगावपुरता मर्यादित नव्हता. औंढा तालुक्यातील पिंपळदरी परिसर, नांदापूर, जामगव्हाण तसेच बाळापूर परिसरातील अनेक गावांमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील हा भाग गेल्या काही काळापासून सातत्याने भूगर्भातील हालचालींमुळे चर्चेत आहे, त्यामुळे आजच्या धक्क्याने स्थानिकांच्या चिंतेत भर घातली आहे.
गत वर्षभरापासून वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातील काहीं गावात अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ११ आणि १७ डिसेंबर रोजी औंढा, कळमनुरी तालुक्यातील काहीं गावात सौम्य धक्का जाणवला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी अचानक भुगर्भात हलचाल जाणवली. यामुळे काहीं गावात नागरिक घराबाहेर आले होते. सर्वच भूकंपाची चर्चा सुरू होती. काही मिनिटांच्या अंतराने तीन धक्के जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हानी झाली नसली तरी या भूकंपामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाची ३.१ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली असून, केंद्र वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) असल्याचे प्रशासनाने सांगितले.
या गावात जाणवला भूकंपाचा धक्का...
औंढा नागनाथ : पिंपळदरी, सोनवाडी, राजदरी, जामगव्हाण, आमदरी, कंजारा, येडूद, देववाडी, फुलदाभा, कळमनुरी तालुक्यात डिग्रस कोंढूर, जवळा पांचाळ, दांडेगाव, आखाडा बाळापूर, रामेश्वर तांडा, डिग्रस (बु.), जांब.
घाबरू नका, पण सावध राहा!
भूकंपाचे धक्के जाणवताच घराबाहेर पडणे, विजेच्या तारा किंवा मोठ्या इमारतींपासून दूर राहणे आवश्यक आहे. हिंगोली जिल्ह्यातील या भूगर्भीय हालचालींचा अभ्यास तज्ज्ञांकडून केला जात असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.