Hingoli: वसमत तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; अनेक गावांना पुराचा वेढा, शाळांना सुटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 10:51 IST2025-09-27T10:50:25+5:302025-09-27T10:51:49+5:30
वसमत तालुक्यात गत २० दिवसांपासून अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे.

Hingoli: वसमत तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; अनेक गावांना पुराचा वेढा, शाळांना सुटी!
- इस्माईल जहागीरदार
वसमत: तालुक्यात शुक्रवार रोजी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदी,ओढ्याला पुर आल्याने अनेक गावांत पाणी शिरले आहे. पूर परिस्थिती गंभीर असल्याने शिक्षण विभागाने शाळांना सुटी घोषित केली. खरिप पिकात गत २० दिवसांपासून पाणी साचलेले आहे. त्यामुळे पिके पूर्णतः हातची गेल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
वसमत तालुक्यात गत २० दिवसांपासून अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे. दरम्यान, २६ सप्टेंबर रोजीच्या रात्रीही तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदीओढ्याला पुर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील शेती पाण्यात गेली आहे. पाणी पातळी वाढल्याने आसना, उघडी नदीने उग्ररुप धारण केले आहे.
तालुक्यातील किन्होळा गावात पुराचे पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचे पाणी जिल्हा परिषद शाळा, टोकाई विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय परिसरात शिरले असून गावातही पुराचे पाणी शिरले होते. बहिरोबा चोंडी,राजवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. सिरळी, कुरुंदा,लोन यासह अनेक गावांतील शाळांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळांना सुटी घोषीत केली आहे.
पुरामुळे तालुक्यात हाहाकार उडाला आहे. तालुक्यातील कुरुंदा गावात सतत पुर परस्थिती निर्माण होत आहे. पूर नियंत्रण मंजूर कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास सरपंच राजेश इंगोले यांनी मागणी केली होती. त्यानंतर आ. राजू नवघरे यांनी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कामासंदर्भात कान टोचले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईने कुरुंदा येथील २०० ते २५० घरात पुराचे पाणी शिरुन नुकसान होत आहे. ग्रामस्थांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसिलदार शारदा दळवी यांनी केले आहे.
कुरुंदा,किन्होळा येथे तहसिलदारांची भेट...
किन्होळा, कुरुंदा या गावात पुराचे पाणी शिरले. राजवाडी, बहिरोबा चोंडी या गावांचा संपर्क तुटला, पूर परस्थितीवर प्रशासनाने नजर ठेवली आहे. नागरीकांना धिर दिल्या जात आहे, तहसिलदार शारदा दळवी यांनी तालुक्यातील गावांना भेटी देऊन नागरीकांना दिलासा दिला आहे.
डोणवाडा येथिल तलाव भरला
तालुक्यातील डोणवाडा येथे असलेला लघु तलाव भरला आहे. तलावातून सुकळी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे कुरुंदा नदी भरुन वाहत आहे. नदी काठावरील शेती खरडून गेली आहे.