हिंगोलीत वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 14:53 IST2021-01-07T14:52:02+5:302021-01-07T14:53:26+5:30
sand मागील काही दिवसांपासून परिसरात वाळूची मोठ्याप्रमाणावर तस्करी करण्यात येत आहे.

हिंगोलीत वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले
शिरडशहापूर :औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ६ जानेवारी रोजी महसूल विभागाच्या पथकाने पकडले. यावेळी महसूल विभागाच्या पथकाने दोन्हीही ट्रॅक्टर जप्त केले आहेत.
मागील काही दिवसांपासून परिसरात वाळूची मोठ्याप्रमाणावर तस्करी करण्यात येत आहे. यासाठी ट्रॅक्टरचा बिनधास्त वापर सुरु आहे. भरधाव वेगाने पळवून वाळू वाहतूक करणाऱ्या या ट्रॅक्टरवर महसूल विभागाचा डोळा होता. परंतु, ते हाती लागत नव्हते. याबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. दरम्यान, पूर्णा नदीच्या नालेगाव परिसरातून शिरडशहापूर व परिसरात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन सुरू होते. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिरडशहापूर येथे दोन ट्रॅक्टर पकडले आहेत.
विशेष म्हणजे दोन्ही ट्रॅक्टरवर क्रमांक नाहीत. ट्रॅक्टर मालक विश्वनाथ संभाजी कदम (रा.वाई), गोविंद शिवाजी राखोंडे (रा.नालेगाव) या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही ट्रॅक्टर औंढा येथील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून पुढील कारवाई सुरु असल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ही कारवाई तहसीलदार कृष्ण कानगुले, सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी राऊत, घुगे ,तलाठी मूकिर काकडे आदींनी केली.