Hingoli: सासरवाडीकडे जात असताना दुचाकीचा अपघात; जावयाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:43 IST2025-09-16T15:42:47+5:302025-09-16T15:43:36+5:30
बाभूळगाव ते लोन रस्त्यावरील घटना

Hingoli: सासरवाडीकडे जात असताना दुचाकीचा अपघात; जावयाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
- इस्माईल जहागीरदार
वसमत (जि. हिंगोली) : पूर्णा तालुक्यातील धार येथे सासरवाडीत निघालेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला बाभूळगाव ते लोन मार्गावर अपघात झाला. या अपघातात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान जावयाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली.
पळसगाव येथील मुंजाजी मिरकुटे (वय ३९) व त्यांची पत्नी चित्रा मिरकुटे (वय ३५) हे दोघे पूर्णा तालुक्यातील धार येथे दुचाकीवर १५ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जात होते. परंतु बाभुळगाव ते लोन मार्गावर दोन दुचाकीचा अपघात झाला. यात मुंजाजी मिरकुटे व चित्रा मिरकुटे हे दोघे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, फौजदार एकनाथ डक, जमादार विजय उपरे यांनी गंभीर जखमींना नागरीकांच्या मदतीने वसमत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान मुंजाजी मिरकुटे यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.