Hingoli: बाप घराबाहेर जाताच लेकीने दोन साथीदारांसह घर लुटले, सात लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:13 IST2026-01-27T19:12:35+5:302026-01-27T19:13:14+5:30
वसमतमध्ये मुलीनेच फोडले वडिलांचे कपाट; ६.८० लाखांचा ऐवजी लंपास करत साथीदारांसह पलायन

Hingoli: बाप घराबाहेर जाताच लेकीने दोन साथीदारांसह घर लुटले, सात लाखांचा ऐवज लंपास
वसमत (हिंगोली): शहरातील मयुरनगर भागात एक अत्यंत चकीत करणारी आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलीनेच आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने स्वतःच्या घरात चोरी करून ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात मुलीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय? मयुरनगर येथील रहिवासी बद्रीनाथ बाबुराव कदम हे २५ जानेवारी रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास काही वैयक्तिक कामासाठी घराबाहेर गेले होते. घर रिकामे असल्याची संधी साधून त्यांची मुलगी धनश्री हिने सोहेल उर्फ गोले आणि एका अनोळखी साथीदाराला बोलावले. या तिघांनी कपाटाचे लॉकर तोडून ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (अंगठ्या, गंठण, लॉकेट) आणि २ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला.
तपासात मुलीचे नाव समोर येताच पोलीसही चक्रावले बद्रीनाथ कदम यांनी घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव घेतली. तपासादरम्यान घरातीलच व्यक्तीचा हात असल्याचा संशय आल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले. स्वतःच्याच मुलीने हा कट रचल्याचे समजताच परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डेडवाल आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असून लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.