हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस; सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 19:19 IST2020-08-17T19:18:16+5:302020-08-17T19:19:15+5:30
परभणी व हिंगोली जिल्ह्यातील नदीकाठच्या 27 गावांना सतर्कतेचा इशारा

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस; सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडले
औंढा नागनाथ : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येलदरी धरणातील पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. या सोबतच सर्वदूर संततधार पाऊस होत असल्याने धरणाची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून पूर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने हिंगोली व परभणी जिल्ह्यातील नदी काठच्या 27 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जोरदार पाऊस सुरु असल्याने येलदरी धरणातून 10 गेटच्या माध्यमातून ३० हजार घनफुट प्रति सेकंद प्रमाणे पाणी सोडण्यात येत आहे. तसेच सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे धरणाचे 8 दरवाजे वक्रद्वार 5 फूट उचलून 34 हजार 600 क्यूसेक्स पाणी पूर्णा नदीपत्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्याचे संकेत पाटबंधारे विभागाचे अभियंता वसीउल्ला खान व अंकित तिवारी यांनी दिले आहे. मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे पूर्णा नदी दुधडी भरून वाहत असल्याने पूर परिस्थिती उदभवण्याची शक्यता आहे. यामुळे नदी काठच्या 27 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.