हिंगोली : येथील रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग लागल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली. या आगीत एक बोगी संपूर्णतः जळून खाक झाली.
हिंगोली येथील रेल्वेस्टेशनवर मागील काही महिन्यांपासून तीन बोगी उभ्या आहेत. यातील एका बोगीला बुधवारी सकाळी अचानक आग लागली. बोगीतून आगीचे लोट आणि धूर बाहेर निघत असल्याचे रेल्वेस्टेशनवरील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग भडकत असल्यामुळे न.प.च्या अग्निशमन दलास माहिती देण्यात आली. त्यानंतर काही मिनिटात अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. परंतु, एका बंबातील पाणी संपले तरी आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे दुसरा बंब मागविण्यात आला. अग्निशमन विभागाच्या सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.