शेतकऱ्याने दहा गुंठ्यांत फुलवली गुलाबशेती; दोन लाखांचे मिळते उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 07:58 PM2019-11-25T19:58:44+5:302019-11-25T20:00:17+5:30

पारंपरिक शेतीला मिळवला चांगला पर्याय

The farmer starts rose flowers farming in ten yard; The yield of two lakhs | शेतकऱ्याने दहा गुंठ्यांत फुलवली गुलाबशेती; दोन लाखांचे मिळते उत्पन्न

शेतकऱ्याने दहा गुंठ्यांत फुलवली गुलाबशेती; दोन लाखांचे मिळते उत्पन्न

Next

- गंगाधर भोसले

वसमत : तालुक्यातील पांगरा बोखारे येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गेल्या सात वर्षांपासून शेतीला जोडव्यवसाय म्हणून भाजीपाला व फूलशेती सुरू केली आहे. गत सहा वर्षांपासुन फूलशेतीचा व्यवसाय करत दरवर्षी १० गुंठ्याच्या गुलाबाच्या शेतीमधून सव्वा ते दीड लाख रूपयांपर्यंत उत्पन्न मिळवले आहे.

तालुक्यातील पांगरा बोखारे येथील गणेश बोखारे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. पाच-सहा वर्षापूर्वीपर्यंत ते  पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. यामध्ये समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होत होते. त्यामुळे ते भाजीपाला शेतीकडे वळले. दोन वर्षे वीस गुंठे शेतीमध्ये त्यांनी भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले. यातही बऱ्याच वेळा नुकसान होत होते. त्यामुळे त्यांनी फूलशेतीचा पर्याय शोधला. जून २०१३ मध्ये त्यांनी  १० गुंठे  शेतात ५०० गुलाबांच्या झाडांची लागवड केली. त्यावेळी त्यांना २७ हजार रूपये खर्च आला. यानंतर ठिबक व्यवस्था केली. गुलाबासाठी मुबलक प्रमाणात पाणी लागते. गुलाबाचा हंगाम वर्षातुन दहा महिने असतो तर दोन महिने उत्पन्नात खंड पडतो. लागवडीनंतर पहिल्या वर्षी त्यांना अल्प प्रमाणात उत्पन्न मिळाले. परंतु बाजारभाव चांगला असल्याने त्यावर्षी १ लाख ९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. एका गुलाबाला पहिल्या हंगामात साधारणत: ६० ते ७० फुले लागतात. 

वर्षभरात एका झाडाला साडेतीनशे ते चारशे फुले निघतात. हंगामानुसार दररोज कमी-अधिक प्रमाणात फुले निघतात. त्याप्रमाणे बाजार भाव देखील ५० रूपयांपासून ते ५०० रुपये किलो पर्यंत असतो. १० महिन्यांचा अंदाज लावल्यास सरासरी दररोज दीड ते दोन हजारांची फुले विकतात. लग्नसराईत गुलाबाला चांगला भाव मिळतो. गत पाच वर्षांपासन दहा गुंठे शेतीमधून दरवर्षी दीड ते दोन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळते. दररोज सकाळी फुले तोडावी लागतात. ते स्वत: फुले तोडून नांदेडच्या बाजारात विकतात. दहा गुंठ्यात दररोज १० ते १२ किलो फुले निघतात. 


गुलाबाच्या फुलांना मिळतोय चांगला दर...
सध्या गुलाबाच्या फुलाचा भाव १५० रुपयांपासून ते २०० पर्यंत असल्याचे ते सांगतात. गुलाब फूलशेतीसाठी फारसे व्यवस्थापन करण्याची गरज नाही. खते व कीटकनाशकेही फारशी लागत नाहीत. केवळ पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची छाटणी करावी लागते. पाऊस पडताच गुलाब बहारदार बनतो. छाटणी उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरते. झेंडू उत्पादनाचाही त्यांनी अनुभव घेतला आहे. पारंपरिक शेतीसोबतच पूरक व्यवसाय करावा, असे ते सांगतात. 

Web Title: The farmer starts rose flowers farming in ten yard; The yield of two lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.