हिंगोलीत 'भारतीय बच्चों की बँक' नोटाद्वारे फसवणूक; दोघे अटकेत, लाखोंच्या बनावट नोटा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 18:44 IST2026-02-26T18:43:47+5:302026-02-26T18:44:31+5:30
पोलिसांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून बनावट नोटा टोळीला पकडलं; साडेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त

हिंगोलीत 'भारतीय बच्चों की बँक' नोटाद्वारे फसवणूक; दोघे अटकेत, लाखोंच्या बनावट नोटा जप्त
कनेरगाव नाका (जि.हिंगोली) : बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा हिंगोली तालुक्यातील बासंबा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, बुधवारी रात्री सापळा रचून पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे ९ बंडल (प्रत्येक बंडल १०० नोटांचे) असे साडेचार लाख रुपये तसेच चारचाकी गाडी आणि मोबाईल असा १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लखन गोपाल बजाज (रा.घाटपुरी नाका, ता.खामगाव जि.बुलढाणा) आणि विजय प्रकाशसिंग ठाकूर (रा.शेगाव नाका, ता.खामगाव, जि.बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 'भारतीय बच्चों की बँक', असे लिहिलेल्या खोट्या नोटा देऊन फसवणूक करणारी टोळी बासंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अधारे २५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९ ते ९:३० वाजण्याच्या सुमारास हिंगोली ते वाशिम रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला. यावेळी आरोपींना संशय आल्याने त्याने फिर्यादीस खऱ्या नोटो घेऊन कनेरगाव नाका येथे बोलावले. त्या ठिकाणी पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन दोघांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडून ५०० रुपयांच्या खोट्या नोटांचे ९ बंडल, मोबाईल, चारचाकी गाडी असा १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई
पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बासंबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास आडे, पोलिस उपिनरीक्षक मदन गव्हाणे, कर्मचारी पोले, भडके, हाके, गुंजकर, कऱ्हाळे, शेख, इंगोले, मस्के, शेख, ठेंगडे, गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ट्रॅक्टर आडवे लावून केली नाकाबंदी
बनावट नोटा देणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी हिंगोली- वाशिम रस्त्यावर टोलनाका येथे नाकाबंदी केली होती. हे लक्षात येताच आरोपींनी त्यांची गाडी राजगावच्या दिशेने वळविली. त्यानंतर राजगाव ते चिंचपुरी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून नाकाबंदी केली. तेथूनही आरोपींनी चिंचपुरी गावात गाडी नेत असताना पोलिसांनी त्यांची गाडी आरोपींच्या गाडीसमोर आडवी लावली. त्यानंतर गाडी सोडून आरोपी पळून जात असताना पाठलाग करुन त्यांना पकडण्यात आले.