आवक वाढल्याने येलदरीनंतर सिद्धेश्वर धरणाचेही दरवाजे उघडण्याची स्थिती
By विजय पाटील | Updated: August 8, 2022 19:03 IST2022-08-08T19:02:52+5:302022-08-08T19:03:17+5:30
पूर्णा नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आवक वाढल्याने येलदरीनंतर सिद्धेश्वर धरणाचेही दरवाजे उघडण्याची स्थिती
हिंगोली : येलदरी व सिद्धेश्वर धरणातील जलसाठाही झपाट्याने वाढत असून, कोणत्याही क्षणी सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
येलदरी धरण ७६.४८ टक्के व सिध्देश्वर धरण ८८.४२ टक्के भरले आहे. येलदरी धरण भरल्यास त्यातून सोडलेले पाणी सिद्धेश्वर धरणात येते. मात्र सिद्धेश्वर धरणच भरत आल्याने कोणत्याही क्षणी धरणातून वक्रद्वाराने पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येऊ शकते. त्यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठावरील, पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे. तसेच कोणीही नदीपात्रात जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासाठी संबंधित गावांमध्ये दवंडी तसेच महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा आदी माध्यमाद्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, अशा सूचना सेनगाव, औंढा नागनाथ आणि वसमतच्या तहसीलदारांना दिलेल्या आहेत.