बैलाच्या धडकेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 14:31 IST2018-11-27T14:30:00+5:302018-11-27T14:31:04+5:30
शेतकरी पुंजाजी रानबा कांबळे (६५) यांना १३ नोव्हेंबर रोजी बैलाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

बैलाच्या धडकेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
नांदापूर (जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील शेतकरी पुंजाजी रानबा कांबळे (६५) यांना १३ नोव्हेंबर रोजी बैलाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. अखेर नांदेड येथे उपचारादरम्यान त्यांचा २६ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.
पुंजाजी कांबळे यांनी शेतात काम करण्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्याचा बैल आणला होता. १३ नोव्हेंबर रोजी स्वत:च्या शेतात बैलाला घेऊन जाताना मागून जोराची धडक दिली होती. यामध्ये पुंजाजी कांबळे हे गंभीर जखमी झाले होते. नातेवाईकांनी जखमी अवस्थेत त्यांना हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.
गंभीर जखमी असल्याने २४ नोव्हेंबर रोजी त्यांना डॉक्टरांनी नांदेडला हलविण्याचे सांगितले. त्यानंतर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. करवाडी येथील स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. घटनेने करवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.