'आमच्यावर जादूटोणा करता', म्हणत दांपत्यास घरात घुसून बेदम मारहाण; चौघांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:25 IST2025-06-25T16:25:31+5:302025-06-25T16:25:53+5:30

याप्रकरणी औंढा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Couple brutally beaten after entering house, saying 'you are casting witchcraft on us'; Crime against four | 'आमच्यावर जादूटोणा करता', म्हणत दांपत्यास घरात घुसून बेदम मारहाण; चौघांविरोधात गुन्हा

'आमच्यावर जादूटोणा करता', म्हणत दांपत्यास घरात घुसून बेदम मारहाण; चौघांविरोधात गुन्हा

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : तालुक्यातील पिंपळदरी येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून शेजारी राहणाऱ्या चौघांनी दांपत्यास बेदम मारहाण केल्याची घटना २२ जून रोजी रात्री ८ वाजेदरम्यान घडली. त्यांच्यावर हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील कौशल्या दिगंबर काळे व दिगंबर गोधाजी काळे या दांपत्यावर जादूटोणा केल्याचा संशय घेत त्यांच्या शेजारी राहणारे राधाबाई कृष्णा रिठ्ठे, कृष्णा गोदाजी रिठ्ठे यांनी २२ जून रोजी रात्री आठ वाजेदरम्यान घरात अनधिकृतरीत्या प्रवेश केला. ‘आमच्या मुला-मुलीवर जादूटोणा, करणी, करतुकी का करता’ असे म्हणत वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, संदीप कृष्णा रिठ्ठे व अन्य एकाने केलेल्या मारहाणीत सहभागी होत कौशल्या काळे व दिगंबर काळे यांना लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कौशल्या काळे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक शेख खुद्दुस करीत आहेत.

Web Title: Couple brutally beaten after entering house, saying 'you are casting witchcraft on us'; Crime against four