corona virus : एसपी साहेब... मदत मागता मागता माझा जीव जात आहे! अखेर त्या कोरोनाबाधित पोलिसाचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 14:44 IST2021-04-29T14:06:44+5:302021-04-29T14:44:24+5:30
corona virus : पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना उद्देशून मदत मागणारी ऑडीओ क्लीप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती.

corona virus : एसपी साहेब... मदत मागता मागता माझा जीव जात आहे! अखेर त्या कोरोनाबाधित पोलिसाचे निधन
हिंगोली : कोरोना उपचारासाठी छतावरून उडी मारून जीव देण्याची धमकी देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अखेर २९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस अधीक्षकांना उद्देशून असलेली त्यांची ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
सचिन पांडूरंग इंगोले (वय 35 रा. गणेशपूर ता.जि. वाशीम) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सचिन इंगोले यांची तब्येत बरोबर नसल्याने त्यांनी कोरोना तपासणी केली होती. यात ते पॉझिटीव्ह निघाल्याने त्यांना २५ एप्रिल रोजी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे योग्य उपचार मिळत नसल्याने तब्येत खालावत चालली होती. त्यांच्या आई-वडीलांवरही उपचार सुरू होते.
पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना उद्देशून मदत मागणारी ऑडीओ क्लीप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. "एसपी साहेब... पोलीस दल व रूग्णालय प्रशासनाला मदत मागता मागता माझा जीव जात आहे. माझ्यावर योग्य उपचार होत नाहीत. मी अनेकांना संपर्क केला. माझ्याकडे एक रूपया देखील नाही. तुम्ही सर्वजण फक्त येतो म्हणत आहात. मात्र कुणीही येत नाही. मला श्वसनाचा खूप त्रास होत असून माझे वडील देखील रूग्णालयात भरती आहेत. साहेब, मी रूग्णालयाच्या टेरेसवरून माझा जीव देत आहे." अशी ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती.
त्यानंतर पोलीस व आरोग्य प्रशासन खडबडून जागे होत उपचारासाठी सरसावले होते. मात्र २९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, सचिन इंगोले हे २०१८ पासून गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे सूत्रांनी सांगितले.