‘शादी डॉटकॉम’ वरून संपर्क, नोकरीचे आमिष अन् अत्याचार; वसमतमधील लिपिक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:05 IST2025-08-08T16:58:36+5:302025-08-08T17:05:02+5:30
‘शादी डॉटकॉम’ वरून संपर्क साधत मैत्री वाढवत केला अत्याचार; याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर (राजुरा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

‘शादी डॉटकॉम’ वरून संपर्क, नोकरीचे आमिष अन् अत्याचार; वसमतमधील लिपिक अटकेत
वसमत (जि. हिंगोली) : येथील पंचायत समितीत कार्यरत असलेल्या लिपिकाने ‘शादी डॉटकॉम’ वरून चंद्रपूर जिल्ह्यातील ४४ वर्षीय महिलेशी जवळीकता साधली आणि नंतर चॅटिंग केली. एवढेच काय तिला नोकरीचे आमिषही दाखविले. नोकरीसाठी तिच्याकडून पाच लाख घेतले व तिच्यावर अत्याचारही केला. याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर (राजुरा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या लिपिकास वसमत येथून दुर्गापूर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
वसमत पंचायत समितीत कार्यरत असलेला लिपिक राजू गणपत येडणे याने चंद्रपूर जिल्ह्यातील महिलेशी २०२३-२४ दरम्यान ‘शादी डॉटकॉम’ वरून संपर्क साधला. त्यानंतर महिलेशी चॅटिंग केली. प्रेमळ बोलून तिच्याशी जवळीकता साधत तिला नोकरीचे आमिष दाखवले. एवढेच काय नोकरी लावतो, त्यासाठी पाच लाख लागतील, असे म्हणून त्या महिलेकडून पाच लाख घेतले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर नोकरी लावण्यास लिपिकाने नकार दिला.
नकार देताच महिलेने केली तक्रार
कालांतराने लिपिकाने महिलेस नकार दिला. अखेर त्या महिलेने ६ ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर (राजुरा) पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून लिपिक येडणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान दुर्गापूर पोलिस ठाण्याचे फौजदार नरेश उरकुडे यांच्या पथकाने त्या लिपिकास वसमत येथून ताब्यात घेतले. लिपिकास ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे, अजय पंडित यांनी सहकार्य केले. रात्री त्या लिपिकास घेऊन चंद्रपूर पोलिस पथक दुर्गापूरकडे रवाना झाले.