हिंगोलीपासून तब्बल १००० किमी दूर सापडला मुलगा; ६ वर्षांनी लेकाची भेट, आईला अश्रु अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 18:19 IST2025-02-13T18:14:35+5:302025-02-13T18:19:30+5:30
विशाखापट्टणम येथील श्रद्धा फाऊंडेशनने मनोरुग्ण वासुदेव याच्यावर केले उपचार; बरा झाल्यानंतर संस्थेनेचे घरी आणून सोडले, भेटीनंतर आईला अश्रु अनावर

हिंगोलीपासून तब्बल १००० किमी दूर सापडला मुलगा; ६ वर्षांनी लेकाची भेट, आईला अश्रु अनावर
- दिलीप कावरखे
गोरेगाव (जि. हिंगोली): कुटुंबापासून दुरावलेल्या वासुदेवच्या प्रतीक्षा करीत असलेल्या आईचे डोळे अक्षरश: कोरडे झाले. पण, सहा वर्षानंतर असा एक दिवस असा उजाडला की त्याच्या आईच्या आनंदाला पारावार नव्हता. तब्बल १००० किमी दूर विशाखापट्टणम येथील श्रद्धा फाऊंडेशनच्या मदतीने पुन्हा घरी परतलेल्या वासुदेवची गळाभेट घेताना त्याच्या आईने आनंदाश्रू अनावर झाले. सगळे कुटुंबच आनंदी झाले.
गोरेगाव येथील वासुदेव ज्ञानबा पोहनकर (वय ४०) हा २०१९ मध्ये घरून निघून गेला. तेव्हापासून घरचे त्याचा शोध घेत होते. परंतु तो सापडला नाही. वासुदेव हा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे रस्त्यावर फिरताना आढळून आला असता ५ ऑक्टोबर २०२४ रोजी श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन (कर्जत) व विशाखापट्टनम येथील ‘एयुटीडी’ स्वयंसेवकांकडून त्याला संस्थेत घेऊन आश्रय दिला. मनोरुग्ण अवस्थेत असल्याने त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. यानंतर वासुदेवची मानसिक अवस्थेत सुधारणा झाल्यानंतर संस्थेने त्याच्या घराचा शोध घेतला. वासुदेव यानेच त्यानंतर घराचा पत्ता सांगितला. संस्थेने मग थेट गोरेगाव गाठले व कुटुंबाच्या स्वाधीन वासुदेवला केले.
१० जानेवारी रोजी कर्जत (महाराष्ट्र) येथील संस्थेत वासुदेवला आणून औषधोपचार सुरू केले. पूर्णपणे बरा झाल्यानंतर संस्थेचे पदाधिकारी ७ फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथे पोहोचले. सहा वर्षांनंतर वासुदेव घरी आल्याचे पाहताच कुटुंबातील सर्व सदस्य आनंदीत झाले होते.