आईच्या संमतीनेच ‘त्या’ चिमुकल्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:55 IST2019-03-23T23:55:21+5:302019-03-23T23:55:37+5:30

तालुक्यातील कहाकर खु. येथे निरागस सहा वर्षीय बालकाच्या हत्येचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. जन्मदात्रीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या गोळ्याचा गळा घोटल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. सेनगाव पोलिसांनी शनिवारी सकाळी मयत बालकाच्या आईला अटक केली आहे.

 The blood of 'those' tinkering with the mother's consent | आईच्या संमतीनेच ‘त्या’ चिमुकल्याचा खून

आईच्या संमतीनेच ‘त्या’ चिमुकल्याचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील कहाकर खु. येथे निरागस सहा वर्षीय बालकाच्या हत्येचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. जन्मदात्रीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या गोळ्याचा गळा घोटल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. सेनगाव पोलिसांनी शनिवारी सकाळी मयत बालकाच्या आईला अटक केली आहे.
सेनगाव तालुक्यातील कहाकर खु. येथे १९ ते २० मार्चदरम्यान कहाकर खु. ते सिनगी खांबा या दोन गावांच्या शिवारातील वेशीवर शेतामध्ये गजानन पंडित शिंदे (६) या बालकाचा गळा आवळून खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत झुडपामध्ये फेकून दिल्याचा प्रकार समोर आला होता. सदर बालकाचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचा अंदाज पूर्वीपासूनच पोलिसांना होता. फिर्यादीतही तसेच म्हटले होते. या प्रकरणात मयत बालकाचा मामा महादजी आयाजी डोखळे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी काशीराम आत्माराम काळेविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. मयत बालकाच्या आईसोबत अनैतिक संबंधाला अडथळा येत असल्याचा कारणामुळे खून केल्याची फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून आरोपी काशीराम काळे यास अटक केली होती. पुढील तपासासाठी न्यायालयाने आरोपी काळे यास २५ मार्चपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या पोलीस कोठडीदरम्यान आरोपी काळे याने गुन्ह्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे. मयत बालक गजानन शिंदे (६) याची आई उषाबाई पंडितराव शिंदे (२६) हिच्यासोबत आपले प्रेमसंबंध होते. आम्हा दोघांना लग्न करावयाचे होते, पण भविष्यात हा मुलगा अडसर होईल, या भीतीने सदर बालकाचा त्याच्या आईच्या संमतीने आपण गळा आवळून खून केल्याचे सांगितले आहे.
आरोपीने कबुली जवाब दिल्यानंतर मयताची आई उषाबाई शिंदे हिला शनिवारी सकाळी पोलिसांनी अटक केली आहे. आईच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सेनगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. केवळ प्रेमसंबंधात अडथळा ठरतोय म्हणून निरागस सहा वर्षीय बालकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर हे करीत आहेत.

Web Title:  The blood of 'those' tinkering with the mother's consent