पीकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; संतप्त ग्रामस्थांनी वाहन पेटवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 20:38 IST2023-12-04T20:38:04+5:302023-12-04T20:38:25+5:30
गंभीर मार लागल्याने दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला.

पीकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; संतप्त ग्रामस्थांनी वाहन पेटवले
हिंगोली : पीक अप वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना हिंगोली ते सेनगाव रोडवरील राहोली बु. येथे ४ डिसेंबर रोजी रात्री ७:३० च्या सुमारास घडली. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पीकअप वाहन पेटवून दिले.
श्रीरंग दत्तराव डोरले (रा. राहोली बु.) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. हिंगोली ते सेनगाव रोडवर राहोली बु. पाटी आहे. येथून मोठ्या प्रमाणात वाहने धावतात. सोमवारी रात्री ७:३० च्या सुमारास श्रीरंग डोरले हे दुचाकीवरून जात होते. याच वेळी एका भरधाव पीकअप वाहनाची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यात त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी काही संतप्त ग्रामस्थांनी पीकअप वाहनाला आग लावून पेटवून दिले. या घटनेत आणखी कोणी जखमी झाले का याची माहिती मात्र समजू शकली नाही. दरम्यान, घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना देण्यात आल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकरणी रात्री ८ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.