अपघातानंतर काळविटाचा मृतदेह २२ तास पडून; वन विभागाला नाही सोयरसुतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 19:54 IST2020-12-23T19:50:55+5:302020-12-23T19:54:31+5:30
नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाचा बाळापूर जवळ अपघातात मृत्यू झाला.

अपघातानंतर काळविटाचा मृतदेह २२ तास पडून; वन विभागाला नाही सोयरसुतक
आखाडा बाळापूर : नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाचा बाळापूर जवळ अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावरच पडलेल्या काळविटाचा मृतदेह पोलिसांनी रस्त्याकडेला हलविला. पण वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी नॉटरिचेबल असल्याने मृत्यूनंतर २० तासापर्यंत मृतदेह जागेवरच पडुन होता.
आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय जवळच नांदेड - हिंगोली रोडवर २२ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजण्याच्या दरम्यान काळवीट रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने काळवीट जागीच मरण पावले. काही ग्रामस्थांना मृतावस्थेतील काळवीट दिसल्यानंतर बाळापूर पोलिसांशी संपर्क साधला. ठाणेदार रवी हुंडेकर, बीट जमादार संजय मार्के, विठ्ठल जाधव घटनास्थळी आले. काळवीट मोठे असल्याने त्याला उचालून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले. पोलिसांनी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु वन विभागाच्या अधिकारी प्रज्ञा सावळे यांनी फोन उचललाच नाही. इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले फोन बंद करून ठेवण्यातच शहाणपण समजले.
परिणामी दुसऱ्या दिवशी २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मृतावस्थेतील काळवीट रस्त्याच्या कडेला तेथेच पडून होते. कुत्र्यापासून नागरिकांना व पोलिसांना या काळविटाचे संरक्षण करावे लागले. परंतु याबाबत कुठलीही गंभीरता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखवली नाही. दुपारी अडीच ते तीन वाजता वनसेवक कऱ्हाळे हजर झाले. पोलिसांनी काळविटाचा मृतदेह वनविभागाच्या स्वाधीन केला. वनविभागाची वन्य प्राण्या विषयी असलेली अनास्था टीकेचा विषय ठरत आहे.