पेपर अवघड गेल्याने परीक्षार्थीने फाडली उत्तरपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 19:27 IST2020-02-28T19:27:00+5:302020-02-28T19:27:42+5:30
केंद्रप्रमुखांनी पाठविला बोर्डाकडे अहवाल

पेपर अवघड गेल्याने परीक्षार्थीने फाडली उत्तरपत्रिका
वसमत : बारावी परीक्षा वसमतमध्ये सुरळीत सुरू असताना आज एका परीक्षार्थ्याने स्वत:ची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका फाडल्याची घटना घडली. संबंधीत विद्यार्थ्यांचा पेपर अवघड गेल्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे वृत्त आहे.
वसमत येथील केंब्रीज महाविद्यालयात बारावीचे परीक्षा केंद्र आहे. बारावी परीक्षेचा वाणिज्य शाखेचा आज वाणिज्य संघटन हा पेपर होता. या केंद्रावरील एका परीक्षार्थ्याने पेपर सुटण्यास अर्धा तास शिल्लक असताना पर्यवेक्षकास पेपर देऊन बाहेर जाण्याची परवानगी मागितली. ती नाकारण्यात आल्याने त्याने स्वत:ची उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिकाच रागाच्या भरात फाडली. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. संबंधित विद्यार्थ्याने केलेल्या या प्रकारानंतर केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांनी पंचनामा करून त्याची उत्तरपत्रिका बोर्डाकडे स्वतंत्ररीत्या पाठवण्याची कारवाई केली असल्याची माहिती केंद्रप्रमुख राजगोरे यांनी दिली. पेपर अवघड गेल्याने रागाच्या भरात हे कृत्य झाल्याचे राजगोरे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ३३ परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. शांततामय वातावरणात विद्यार्थ्यांनी पेपर सोडवावेत, असे आवाहन वेळोवेळी शिक्षण विभागातर्फे केले जात आहे.