लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गतवर्षी हुतात्मा स्मारकांच्या डागडुजीचे काम केल्यानंतर यंदा दहा स्मारकांमध्ये एलसीडी प्रोजेक्टर, खुर्च्या इ. साहित्यासाठी दहा लाखांचा निधी शासनाने दिला आहे. लवकरच या साहित्याचा पुरवठा होणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या हुतात्मा स्मारकांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली होती. देखभाल व दुरुस्तीचा प्रश्न कायम निर्माण होण्यामागे या इमारतींचा वापर नसणे हे एक कारण आहे.त्यामुळे आता या स्मारकांचा वापर होण्यासाठी तेथे विविध उपक्रम घेता यावेत, यादृष्टीने प्रत्येकी एक एलसीडी प्रोजेक्टर, पन्नास खुर्च्या आणि एक कपाट घेऊन देण्यात येणार आहे.यासाठी दहा लाखांचा निधी आला आहे. हा खर्च करण्यासाठी सूचना देण्यात आल्या असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांनी सांगितले.यापूर्वी अशा स्मारकांच्या डागडुजीची कामे झाली आहेत.यामध्ये अनेक स्मारकांच्या सिलींगसह किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटीची कामे झाली आहेत. यातील काही ठिकाणी सिलींग मात्र पावसाळ्यामुळे तेव्हाच गळून पडल्याचा प्रकारही घडला होता. यातील अनेक स्मारकांचा वापरच होत नसल्याची अडचण आहे.त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता व इतर समस्या उद्भवतात. याबाबत काही निर्णय झाल्यास या स्मारकांची त्यातून मुक्तता करणे शक्य आहे.
हुतात्मा स्मारकांसाठी आणखी दहा लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:23 IST